छत्रपती संभाजीनगर : भाऊबीजेच्या सणानिमित्त MIDC वाळूज पोलिसांनी नागरिकांना अनोखी भेट दिली आहे. यापूर्वी दुचाकी चोरीच्या गुन्ह्यांमध्ये जप्त करण्यात आलेल्या तब्बल 14 मोटारसायकली बुधवारी (11 नोव्हेंबर) त्यांच्या मूळ मालकांना परत करण्यात आल्या. अनेक दिवसांपासून चोरीला गेलेल्या आपल्या दुचाकी पुन्हा मिळाल्याने वाहनमालकांच्या चेहऱ्यावर आनंद झळकला.
MIDC वाळूज औद्योगिक परिसरात कामगार आणि नागरिकांच्या दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत होती. या पार्श्वभूमीवर MIDC वाळूज पोलीस ठाण्याच्या वतीने विशेष मोहीम राबविण्यात आली होती. पोलीस उपनिरीक्षक सागर पाटील यांच्या नेतृत्वाखालील विशेष पथकाने तांत्रिक माहिती आणि गोपनीय बातमीदारांच्या मदतीने दुचाकी चोरीच्या गुन्ह्यांचा तपास केला.
या तपासादरम्यान पप्पू कृष्णा ऊर्फ किसान पवार (वय 30, रा. नांदर, ता. पैठण, जि. छत्रपती संभाजीनगर) याला यापूर्वीच ताब्यात घेण्यात आले होते. त्याच्याकडून चोरीच्या एकूण 14 मोटारसायकली हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले होते. या कारवाईमुळे दुचाकी चोरीचे अनेक गुन्हे उघडकीस आले होते.
दरम्यान, भाऊबीजेचे औचित्य साधून 11 नोव्हेंबर रोजी MIDC वाळूज, दौलताबाद, पुंडलिकनगर तसेच छत्रपती संभाजीनगर ग्रामीण हद्दीतील चिकलठाणा आणि पाचोड पोलीस ठाण्याच्या परिसरातील मूळ वाहनमालकांना त्यांच्या मोटारसायकली परत करण्यात आल्या. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा वाहनवाटपाचा कार्यक्रम पार पडला.
चोरीला गेलेली दुचाकी पुन्हा मिळाल्याने वाहनमालकांनी पोलिसांचे आभार मानले. काही वाहनमालकांनी वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा शाल-पुष्पगुच्छ देऊन सत्कारही केला.
पोलीस आयुक्त प्रवीण पवार, पोलीस उपायुक्त पंकज अतुलकर आणि सहायक पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे, पोलीस उपनिरीक्षक सागर पाटील व त्यांच्या पथकाने ही कामगिरी केली. भाऊबीजेच्या निमित्ताने नागरिकांना त्यांच्या हक्काच्या दुचाकी परत मिळाल्याने पोलिसांच्या या उपक्रमाचे कौतुक होत आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/CF89MLzjXiJLRGIbwDr7te
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*