छत्रपती संभाजीनगर : दुष्काळामुळे आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात टिकवून ठेवण्यासाठी शासनाने घेतलेल्या परीक्षा शुल्क माफीच्या निर्णयाचा मोठा फायदा मराठवाड्यातील विद्यार्थ्यांना झाला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने या निर्णयाची अंमलबजावणी करत तब्बल 2 लाख 96 हजार 114 विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कातून सूट दिली आहे. एवढेच नव्हे, तर आधीच शुल्क भरलेल्या विद्यार्थ्यांचे पैसेही परत करण्यात आले आहेत.
विद्यापीठाशी संलग्न असलेल्या 51 महाविद्यालयांतील 25 हजार 74 विद्यार्थ्यांनी परीक्षा शुल्क भरले होते. या विद्यार्थ्यांना त्यांचे पैसे परत मिळावेत, यासाठी विद्यापीठ प्रशासनाने विशेष व्यवस्था केली. दिवाळीच्या सुट्ट्या सुरू असतानाही कार्यालय सुरू ठेवून शुल्क परताव्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. त्यामुळे शासनाच्या निर्णयाची केवळ कागदोपत्री अंमलबजावणी न करता प्रत्यक्ष विद्यार्थ्यांपर्यंत त्याचा लाभ पोहोचवण्यात आला.
दुष्काळाच्या परिस्थितीत विद्यार्थ्यांच्या शिक्षणात आर्थिक अडथळे निर्माण होऊ नयेत, ही या निर्णयामागील प्रमुख भूमिका होती. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी राज्यातील विद्यापीठांच्या कुलगुरू आणि अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन पात्र विद्यार्थ्यांना शुल्क माफीचा लाभ देण्याचे स्पष्ट निर्देश दिले होते. उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांनीही यासंदर्भात वेळोवेळी परिपत्रके काढून कार्यवाहीला गती दिली.
दरम्यान, विद्यापीठाच्या पदवी अभ्यासक्रमांच्या परीक्षा 27 ऑक्टोबरपासून सुरू झाल्या आहेत. बी.ए., बी.एस्सी., बी.कॉम. यांसह 14 पदवी अभ्यासक्रमांच्या परीक्षा घेतल्या जात आहेत. तर व्यावसायिक आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या परीक्षा 21 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहेत.
परीक्षा प्रक्रियेत कोणताही अडथळा येऊ नये, यासाठी परीक्षा विभागाने वेळापत्रक, मूल्यांकन केंद्रे आणि आवश्यक नियोजन केले आहे. कुलगुरू डॉ. फुलारी यांच्या निर्देशानुसार पात्र विद्यार्थ्यांना योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी विशेष यंत्रणा कार्यरत होती. या संपूर्ण प्रक्रियेमुळे दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना आर्थिक आधार मिळाला आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/CF89MLzjXiJLRGIbwDr7te
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*