छत्रपती संभाजीनगर : घराला कुलूप लावून कुटुंब बाहेरगावी गेले की चोरट्यांसाठी ती संधी ठरू शकते, याचा प्रत्यय सादात नगर परिसरात आला आहे. हैदराबादला गेलेल्या एका प्लॉटिंग व्यावसायिकाच्या बंद फ्लॅटवर चोरट्याने डल्ला मारत दोन लाखांची रोकड आणि सोन्याचे दागिने लंपास केले. विशेष म्हणजे, इमारतीच्या लिफ्टचा वापर करून चोरटा थेट चौथ्या मजल्यावर पोहोचला आणि तब्बल दीड तास फ्लॅटमध्ये थांबला. त्याची ही संपूर्ण ये-जा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात नोंदली गेली आहे.
सादात अपार्टमेंटमधील फ्लॅट क्रमांक ४०४ मध्ये उजेफ खान अजिज खान पठाण (४०) हे कुटुंबासह राहतात. १० नोव्हेंबर रोजी सकाळी सहाच्या सुमारास ते हैदराबादला रवाना झाले. घर बंद असल्याची संधी साधून त्याच रात्री एका अज्ञात व्यक्तीने त्यांच्या फ्लॅटमध्ये प्रवेश केला. दरवाजाचे कुलूप तोडून घरात शिरलेल्या चोरट्याने कपाटातील ऐवज शोधून काढला. यात दोन लाख रुपये रोख, १० ग्रॅम व २१ ग्रॅम वजनाचे दोन नेकलेस आणि आठ ग्रॅम वजनाचे सोन्याचे कानातले दोन जोड असा मुद्देमाल त्याने चोरून नेला.
१३ नोव्हेंबरच्या रात्री पठाण कुटुंबीय घरी परतल्यानंतर चोरीचा प्रकार समोर आला. घरातील सामानाची उलथापालथ झालेली पाहून त्यांनी तातडीने सीसीटीव्ही तपासले. त्यात रात्री ९ वाजता एक अनोळखी व्यक्ती लिफ्टने वर जाताना आणि रात्री १०.३० वाजता खाली येताना दिसली.
चोरीपूर्वी माहिती मिळवली होती का?
कुटुंब बाहेरगावी जाणार असल्याची माहिती चोरट्याला आधीपासून होती का, याबाबत संशय व्यक्त केला जात आहे. पूर्वनियोजन करून फ्लॅटवर पाळत ठेवली असण्याची शक्यताही नाकारता येत नाही. या प्रकरणी सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, पोलीस उपनिरीक्षक नंदकुमार भंडारे तपास करत आहेत.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/CF89MLzjXiJLRGIbwDr7te
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*