छत्रपती संभाजीनगर : सणासुदीच्या काळात प्रवाशांची वाढलेली संख्या एसटी महामंडळाच्या पथ्यावर पडली आहे. दिवाळीच्या निमित्ताने गावी जाणाऱ्या आणि नातेवाइकांच्या भेटीसाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांनी लालपरीला पसंती दिल्याने छत्रपती संभाजीनगर एसटी विभागाच्या उत्पन्नात यंदा मोठी वाढ झाली आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा विभागाच्या कमाईत १३ लाख १२ हजार ४२७ रुपयांची भर पडली आहे.
दिवाळीच्या दिवसांत शहरातून ग्रामीण भागाकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढते. पाडवा आणि भाऊबीज या सणांच्या निमित्ताने प्रवासाचे प्रमाण अधिक असते. याच काळात एसटी बसमधून प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढल्याचे दिसून आले. खासगी वाहनांच्या तुलनेत सुरक्षित प्रवास आणि सर्वसामान्यांना परवडणारे भाडे यामुळे अनेक प्रवाशांनी एसटीचा पर्याय निवडला. या वाढलेल्या प्रवासी प्रतिसादाचा थेट परिणाम विभागाच्या उत्पन्नावर झाला.
यंदाच्या दिवाळीत छत्रपती संभाजीनगर एसटी विभागाने १४ दिवसांच्या कालावधीत ३६ लाख १७ हजार ५७६ रुपयांचे उत्पन्न मिळवले. विशेष म्हणजे, मागील वर्षी दिवाळीच्या नऊ दिवसांत विभागाला २३ लाख ५१ हजार १४९ रुपये मिळाले होते. यंदा कालावधी पाच दिवसांनी अधिक असतानाच एकूण उत्पन्नातही मोठी वाढ झाली आहे.
दोन्ही वर्षांच्या आकडेवारीची तुलना करता यंदा एसटीच्या उत्पन्नात १३ लाख १२ हजार ४२७ रुपयांची वाढ झाल्याचे स्पष्ट होते. सणासुदीच्या काळात प्रवाशांनी दिलेला प्रतिसाद एसटी प्रशासनासाठी दिलासादायक ठरला आहे. प्रवाशांचा हा विश्वास आणि वाढती पसंती आगामी काळातही कायम राहणार का, याकडे आता लक्ष लागले आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/CF89MLzjXiJLRGIbwDr7te
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*