छत्रपती संभाजीनगर : नागरिकांना सुरक्षित आणि दर्जेदार अन्नपदार्थ उपलब्ध व्हावेत, यासाठी अन्न व औषध प्रशासनाकडून (FDA) राबविण्यात येत असलेल्या ‘Safe Food Safe Maharashtra’ मोहिमेअंतर्गत जिल्ह्यात मोठी कारवाई करण्यात आली आहे. अस्वच्छता, अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन आणि गंभीर त्रुटी आढळल्याने तीन हॉटेलसह एका मिठाई उत्पादकाचा अन्न व्यवसाय परवाना व नोंदणी प्रमाणपत्र तात्काळ निलंबित करण्यात आले आहे. १८ नोव्हेंबर रोजी करण्यात आलेल्या तपासणीनंतर ही कारवाई करण्यात आली.
कारवाई करण्यात आलेल्या आस्थापनांमध्ये कन्नड तालुक्यातील वासडी येथील मे. श्री नवसाचा राजा गणपती बाप्पा कोल्ड्रिंक्स अँड पेढा सेंटर आणि मे. हॉटेल श्री गणेश पेढा यांचा समावेश आहे. या दोन्ही ठिकाणी फरशीवर धूळ व घाण, उघड्यावर मिठाई ठेवणे, स्वच्छतेचा अभाव आणि कर्मचाऱ्यांकडे आवश्यक वैद्यकीय तपासणी अहवाल व FoSTaC प्रशिक्षण प्रमाणपत्र नसल्याचे आढळले. तसेच एका आस्थापनाकडे फिरता अन्न विक्रेता म्हणून नोंदणी असताना प्रत्यक्षात मिठाई उत्पादन सुरू असल्याचेही तपासणीत स्पष्ट झाले.
याशिवाय, सिडको वाळूज महानगर परिसरातील तिसगाव येथील मे. हॉटेल रुद्रया येथे तुटलेल्या फरशा, अस्वच्छ छत, सांडपाणी निचऱ्याची व्यवस्था नसणे, कचऱ्याची योग्य विल्हेवाट न लावणे आणि पिण्याच्या पाण्याचा NABL चाचणी अहवाल उपलब्ध नसल्याचे आढळले. तर देवळाई येथील खडी रोडवरील मे. महादेव बिकानेर मिठाईवाला येथे अपुरे वायुवीजन, अन्नपदार्थांसोबत रसायने ठेवणे, कीड नियंत्रणाचा अभाव आणि कामगारांकडून संरक्षक पोशाखाचा वापर होत नसल्याचे निदर्शनास आले.
तपासणीत या चारही आस्थापनांना समाधानकारक गुण मिळाले नसल्याचे प्रशासनाने नमूद केले आहे. अन्न सुरक्षा व मानके अधिनियम २००६ च्या कलम ३२(३) अन्वये या आस्थापनांचा अन्न व्यवसाय, उत्पादन आणि विक्री पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
सर्व त्रुटींची पूर्तता करून पुराव्यांसह अहवाल सादर करणे आणि फेरतपासणीत समाधानकारक सुधारणा आढळणे आवश्यक आहे. त्यानंतरच परवाना निलंबन उठविण्याबाबत विचार केला जाणार आहे. अन्न व्यवसाय चालकांनी स्वच्छतेचे नियम आणि अन्न सुरक्षा मानकांचे काटेकोर पालन करावे, अन्यथा कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा अन्न व औषध प्रशासनाचे सहआयुक्त श्रीकांत करकळे यांनी दिला आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/L3fP7E9DOigDdN0hpVeAGX?s=cl&p=a&iam=2
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*