छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूक प्रक्रियेसाठी एसटी महामंडळाच्या मोठ्या प्रमाणावर बस वापरल्या जाणार असल्याने प्रवाशांना पुढील दोन दिवस प्रवासात अडचणींचा सामना करावा लागणार आहे. शुक्रवारी आणि शनिवारी तब्बल २४४ एसटी बस निवडणूक कामांसाठी तैनात करण्यात आल्या असून त्यामुळे अनेक मार्गांवरील नियमित फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे नागरिकांनी या काळात प्रवास करण्यापूर्वी आपल्या मार्गावरील बस उपलब्ध आहे की नाही, याची खात्री करूनच घराबाहेर पडावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
७ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या मतदानासाठी शुक्रवारी मतदानाचे साहित्य, अधिकारी आणि कर्मचारी मतदान केंद्रांपर्यंत पोहोचविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर एसटी बसचा वापर केला जाणार आहे. तसेच शनिवारी मतदानानंतर मतदान साहित्य पुन्हा मतमोजणी केंद्रांवर आणण्यासाठीही एसटी बस आवश्यक असल्याने वाहतूक व्यवस्थेत मोठा बदल करण्यात आला आहे.
विभागीय वाहतूक अधिकारी संतोष घाणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, बस फेऱ्या रद्द करताना कमी उत्पन्न देणाऱ्या फेऱ्यांना प्राधान्याने स्थगित करण्यात आले आहे. यामध्ये शालेय फेऱ्या तसेच ग्रामीण भागातील अनेक फेऱ्यांचा समावेश आहे. याशिवाय काही लांब पल्ल्याच्या बससेवाही रद्द करण्यात आल्या आहेत.
सोलापूर, अकोला, नागपूर, यवतमाळ, बुलढाणा, जळगाव आणि कलबुर्गी या मार्गांवरील काही फेऱ्या रद्द करण्यात आल्या असून सिल्लोड, कन्नड, वैजापूरसह ग्रामीण भागात जाणाऱ्या अनेक बसही या काळात धावणार नाहीत. त्यामुळे ग्रामीण प्रवाशांना विशेष त्रास होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, पुणे आणि नाशिक मार्गावरील बससेवा सुरळीत सुरू राहणार असल्याची माहितीही प्रशासनाने दिली आहे. पुणे मार्गावर ई-बस धावत असून या मार्गावरील प्रवाशांना मोठा फटका बसणार नाही, असे संतोष घाणे यांनी स्पष्ट केले. निवडणूक कामकाज पूर्ण झाल्यानंतर बससेवा पुन्हा पूर्ववत करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/IJbzVXxActY7zUsWoQ3lSr?mode=gi_t
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*