राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या वेळापत्रकात महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे राज्यात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आल्याने राज्य निवडणूक आयोगाने १२ जिल्हा परिषदा आणि त्याअंतर्गत १२५ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या उर्वरित टप्प्यांमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे आधी जाहीर करण्यात आलेल्या मतदान आणि मतमोजणीच्या तारखा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.
राज्य निवडणूक आयोगाने १३ जानेवारी २०२६ रोजी या निवडणुकांचा सविस्तर कार्यक्रम जाहीर केला होता. त्यानुसार नामनिर्देशनपत्र दाखल करणे, नामनिर्देशनपत्र छाननी, नामनिर्देशन मागे घेणे, निवडणूक चिन्हांचे वाटप तसेच अंतिम उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. मात्र मतदान, मतमोजणी आणि निवडून आलेल्या सदस्यांची नावे शासन राजपत्रात प्रसिद्ध करणे हे महत्त्वाचे टप्पे अद्याप बाकी होते.
दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने या निवडणुकांसाठी ३१ जानेवारी २०२६ नंतर केवळ दोन आठवड्यांची मुदतवाढ दिली आहे. अशा परिस्थितीत २८ जानेवारी २०२६ रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन झाल्याने राज्य शासनाने २८ ते ३० जानेवारी २०२६ या कालावधीत राज्यभर दुखवटा जाहीर केला. या पार्श्वभूमीवर निवडणूक प्रक्रियेतील उर्वरित टप्प्यांमध्ये बदल करणे आवश्यक ठरले.
सुधारित कार्यक्रमानुसार, पूर्वी ५ फेब्रुवारी २०२६ रोजी होणारे मतदान आता ७ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत होणार आहे. तसेच ७ फेब्रुवारीऐवजी आता ९ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १० वाजता मतमोजणी करण्यात येणार आहे. निवडणुकीसाठी जाहीर प्रचाराची समाप्ती ५ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री १० वाजता होईल.
संबंधित जिल्हाधिकारी सुधारित निवडणूक कार्यक्रमाची सूचना ३१ जानेवारी २०२६ रोजी प्रसिद्ध करतील. निकाल जाहीर झाल्यानंतर संबंधित ठिकाणची आचारसंहिता संपुष्टात येईल. तसेच निवडून आलेल्या सदस्यांची नावे ११ फेब्रुवारी २०२६ पर्यंत शासन राजपत्रात प्रसिद्ध केली जाणार असल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/IJbzVXxActY7zUsWoQ3lSr?mode=gi_t
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*