छत्रपती संभाजीनगर : शहरातील सिडको पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोटारसायकल चोरीच्या वाढत्या घटनांचा छडा लावत पोलिसांनी चार जणांच्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत विविध कंपन्यांच्या तब्बल २८ चोरीच्या मोटारसायकली जप्त करण्यात आल्या असून त्यांची एकूण किंमत सुमारे ११ लाख २० हजार रुपये आहे.
पोलिसांनी गुन्ह्याचा तपास करताना परिसरातील सुमारे ५० सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. तसेच गुप्त बातमीदारांकडून मिळालेली माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे संशयितांचा माग काढण्यात आला. तपासादरम्यान योगेश कैलास गाडेकर याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने चोरी केलेल्या मोटारसायकली आपल्या साथीदारांच्या मदतीने ग्रामीण भागात विक्रीसाठी ठेवल्याची कबुली दिली.
यानंतर पोलिसांनी कार्तिक गणेश पवार, सौरभ दिलीप वाघचौरे आणि राहुल कैलास बोरसे या तिघांनाही ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यातून टप्प्याटप्प्याने चोरीच्या २८ मोटारसायकली जप्त करण्यात आल्या. न्यायालयाने आरोपींना १० दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून या टोळीने आणखी चोरीचे गुन्हे केले असण्याची शक्यता लक्षात घेऊन पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त प्रवीण पवार, पोलीस उपायुक्त रत्नाकर नवले, सहाय्यक पोलीस आयुक्त मनोज पगारे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल येरमे आणि त्यांच्या पथकाने केली. दरम्यान, नागरिकांनी कोणतीही जुनी मोटारसायकल खरेदी करण्यापूर्वी तिची सर्व कागदपत्रे, मालकी हक्क आणि वाहनाची माहिती तपासूनच व्यवहार करावा, अन्यथा चोरीचे वाहन खरेदी करणाऱ्यांवरही कायदेशीर कारवाई होऊ शकते, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/KYaIrqX6xIM3SpZ1FYjFWw?s=cl&p=a&ilr=0
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*