छत्रपती संभाजीनगर : वयोवृद्ध महिलांना लॉटरी लागल्याचे आमिष दाखवून तसेच स्वतःला पोलिस असल्याची बतावणी करून त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने लंपास करणाऱ्या सराईत आरोपीला छत्रपती संभाजीनगर गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. विशेष म्हणजे, पोलिसांच्या नजरेतून बचाव करण्यासाठी आरोपी प्रत्येक गुन्ह्यानंतर वेगवेगळे गेटअप करून शहरात फिरत होता. मात्र, तांत्रिक तपास, सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय माहितीच्या आधारे गुन्हे शाखेने त्याचा पर्दाफाश करत आरोपीला जेरबंद केले. या कारवाईत २९ लाख २ हजार २८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, शहरातील आठ गुन्हे उघडकीस आले आहेत.

या प्रकरणातील फिर्यादी कमलबाई सुखदेव शिंदे (वय ६८, रा. शिवेश्वर कॉलनी, हर्सूल) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्या २६ जुलै रोजी हर्सूल टी-पॉईंट येथून पायी घरी जात असताना एका अनोळखी व्यक्तीने त्यांना अडवून, “आजी, तुम्हाला लॉटरी लागली आहे,” असे सांगत विश्वास संपादन केला. कमलबाई यांनी मुलाला बोलावून घेते असे सांगितल्यानंतर आरोपीने त्यांना बोलण्यात गुंतवून मोटारसायकलवर बसवून राजधानी हॉटेल परिसरात नेले. तेथे बँकेतील अधिकाऱ्यांना दाखविण्याच्या बहाण्याने त्यांच्या हातातील सुमारे तीन तोळे सोन्याच्या बांगड्या काढून घेतल्या. त्यानंतर “समोरील बँकेत जाऊन तुमच्या बांगड्या आणि लॉटरीचे पैसे मिळतील,” असे सांगून आरोपी तेथून पसार झाला. संबंधित ठिकाणी कोणतीही बँक नसल्याचे लक्षात आल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे महिलेच्या निदर्शनास आले. याप्रकरणी हर्सूल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

गुन्ह्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन तांत्रिक तपास सुरू केला. गोपनीय माहिती आणि तपासाच्या आधारे आरोपीची ओळख पटवून त्याला ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान आरोपीने आपल्या साथीदाराच्या मदतीने छत्रपती संभाजीनगर शहरातील विविध भागांमध्ये वयोवृद्ध महिलांना लॉटरी लागल्याचे आमिष दाखवून तसेच स्वतःला पोलिस असल्याचे सांगून त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने फसवणुकीने घेतल्याची कबुली दिली. त्याने हे दागिने एका सोनाराला विकल्याचेही पोलिसांना सांगितले.

विशेष म्हणजे, प्रत्येक गुन्ह्यानंतर आरोपी वेगवेगळे गेटअप करून शहरात वावरत होता. त्यामुळे त्याची ओळख पटविणे पोलिसांसाठी आव्हानात्मक ठरत होते. मात्र, गुन्हे शाखेने तांत्रिक तपास, सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय माहितीच्या आधारे आरोपीचा माग काढत त्याला अटक करण्यात यश मिळवले.

यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपीकडून गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल तसेच सोनाराकडून विक्री केलेले सोन्याचे दागिने जप्त केले. या कारवाईत २८ लाख २२ हजार २८० रुपयांचे २६.५ तोळे सोन्याचे दागिने आणि ८० हजार रुपयांची मोटारसायकल, असा एकूण २९ लाख २ हजार २८० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. तपासात आरोपीविरुद्ध शहरातील अशाच प्रकारचे आठ गुन्हे उघडकीस आले असून, गुन्ह्यात वापरण्यात आलेली मोटारसायकल नागपूर शहरातील सक्करदरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरी करण्यात आल्याचेही निष्पन्न झाले आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त प्रवीण पवार, पोलीस उपायुक्त (गुन्हे) प्रशांत सातव आणि सहायक पोलीस आयुक्त मनोज समद यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या पथकाने केली असून, आरोपीला पुढील तपासासाठी हर्सूल पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/KYaIrqX6xIM3SpZ1FYjFWw?s=cl&p=a&ilr=0

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

354 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क