छत्रपती संभाजीनगर : शहरातील सातारा परिसरातील भक्तप्रल्हाद सोसायटीमध्ये चोरट्यांनी एका रात्रीत तब्बल चार घरे फोडल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घरफोड्यांमध्ये एका सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर तरुणीचे घरही लक्ष्य करण्यात आले. चोरट्यांनी घरातील लोखंडी कपाट फोडून सुमारे ३ तोळे सोन्याचे दागिने आणि ₹३५ हजारांची रोकड असा लाखोंचा ऐवज लंपास केला. या प्रकरणी सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी करिष्मा शिवलाल जैस्वाल (वय २७) या आई यशोदाबाई यांच्यासोबत भक्तप्रल्हाद सोसायटीत भाड्याने राहतात आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर म्हणून कार्यरत आहेत. करिष्मा या २० जुलै रोजी एका वेबसिरीजच्या ऑडिशनसाठी पुणे येथे गेल्या होत्या, तर त्यांच्या आई २६ जुलै रोजी घराला कुलूप लावून मूळ गावी टेंभुर्णी येथे गेल्या होत्या. त्यामुळे घर अनेक दिवस बंद होते.

शनिवारी सकाळी शेजाऱ्यांनी घरात चोरी झाल्याची माहिती दिल्यानंतर करिष्मा यांनी मित्रामार्फत खात्री करून घेतली. त्यानंतर त्या रविवारी घरी आल्यानंतर बेडरूममधील लोखंडी कपाट फोडलेले दिसून आले. कपाटातून ₹३५ हजारांची रोकड, दोन सोन्याच्या अंगठ्या, झुंबर तसेच कानातील टॉप्स व रिंगांसह सुमारे ३ तोळे सोन्याचे दागिने चोरीला गेल्याचे स्पष्ट झाले.

दरम्यान, चोरट्यांनी याच परिसरातील ज्ञानेश्वर रेवणवार, शिवकुमार कापसे आणि ताराचंद साळुंके यांचीही घरे फोडल्याचे समोर आले आहे. एका रात्रीत चार घरांमध्ये चोरी झाल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घरफोडी करणारी टोळी धुळे–सोलापूर महामार्गाच्या मार्गाने आली आणि त्याच मार्गाने पसार झाल्याचा पोलिसांना संशय असून त्या दृष्टीने तपास सुरू आहे. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक शिवाजी घोरपडे करत आहेत.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/KYaIrqX6xIM3SpZ1FYjFWw?s=cl&p=a&ilr=0

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

1,039 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क