सिल्लोड : सिल्लोड शहरात अनैतिक प्रेमसंबंधातून पतीचा गळा चिरून निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणाचा सिल्लोड पोलिसांनी अवघ्या काही तासांत छडा लावत मृताच्या पत्नीसह तिचा प्रियकर आणि त्याच्या मित्राला अटक केली आहे. न्यायालयाने तिन्ही आरोपींना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

मृत व्यक्तीचे नाव अशोक ग्यानसिंग मीना (वय ४०, रा. भोकणवाडी, जि. खंडवा, मध्य प्रदेश) असे आहे. २७ जुलैच्या रात्री ही हत्या करण्यात आली होती. त्यानंतर २९ जुलै रोजी सिल्लोड-भोकरदन रस्त्यालगत नगरपरिषदेच्या पाण्याच्या टाकीजवळ त्यांचा छिन्नविछिन्न अवस्थेतील मृतदेह आढळून आला. गळा चिरलेला आणि डोक्यावर गंभीर दुखापती असल्याने सुरुवातीला मृताची ओळख पटवणे आणि आरोपींचा शोध घेणे, असे मोठे आव्हान पोलिसांसमोर होते.

सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. तपासादरम्यान मृत अशोक हे संशयितांसोबत जात असल्याचे फुटेजमध्ये स्पष्ट झाले. त्यानंतर पोलिसांनी रविवारी मध्यरात्री मृताची पत्नी कौशल्याबाई अशोक मीना (रा. वेरूळ), तिचा कथित प्रियकर रियाज शह खालेद शहा आणि त्याचा मित्र आकाश आत्माराम इंगळे यांना अनुक्रमे वेरूळ, परतूर आणि भोकरदन येथून अटक केली.

प्राथमिक तपासानुसार, अशोक आणि कौशल्याबाई यांचा २१ वर्षांपूर्वी विवाह झाला होता. वेरूळ परिसरात मजुरी करत असताना कौशल्याची अद्रक व्यापारी रियाज शहा याच्याशी ओळख झाली आणि पुढे त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. या संबंधांची माहिती अशोक यांना मिळाल्यानंतर पती-पत्नीमध्ये वारंवार वाद होत होते. अशोक पत्नीला मूळ गावी जाण्याचा आग्रह धरत असल्याने कौशल्याने प्रियकराच्या मदतीने पतीच्या हत्येचा कट रचल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास सिल्लोड पोलीस करत असून, हत्येमागील इतर बाबींचाही तपास सुरू आहे. मृत अशोक मीना यांच्या पश्चात एक मुलगा आणि दोन मुली असा परिवार आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/KYaIrqX6xIM3SpZ1FYjFWw?s=cl&p=a&ilr=0

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

1,872 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क