छत्रपती संभाजीनगर : शहरामध्ये बालकांशी संबंधित लैंगिक स्वरूपाची आक्षेपार्ह डिजिटल सामग्री (Child Sexual Abuse Material – CSAM) टेलिग्रामद्वारे विक्री करणाऱ्या बी.कॉम. द्वितीय वर्षातील दोन वर्गमित्रांना शहर सायबर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या कारवाईत त्यांच्या ताब्यातील मोबाइल, टॅब जप्त करण्यात आले असून टेलिग्राम खात्याच्या क्लाऊडमध्ये सुमारे तीन हजारांहून अधिक आक्षेपार्ह व्हिडिओ आढळल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी ४ ऑगस्ट रोजी सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपींची नावे शुभम राजेंद्र लोहाडे (२०, पाथरीकरनगर, हडको) आणि पार्थ सुनील कुलकर्णी (२१, सुभाषचंद्र बोसनगर, टीव्ही सेंटर) अशी आहेत. दोघेही बी.कॉम. द्वितीय वर्षात शिकणारे वर्गमित्र असून गेल्या दीड वर्षापासून टेलिग्राम नेटवर्कद्वारे हा अवैध प्रकार करत असल्याचा पोलिसांचा संशय आहे. सायबर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोमनाथ जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अंमलदार अमोल सोनटक्के, सचिन संपाळ, योगेश तळवंदे आणि पथकाने दोघांचा शोध घेऊन ताब्यात घेतले.

प्राथमिक तपासात आरोपी टेलिग्रामवरील विविध चॅनेलवर आक्षेपार्ह डिजिटल सामग्रीच्या जाहिराती करत असल्याचे समोर आले आहे. ग्राहक संपर्क साधल्यानंतर विश्वास संपादन करण्यासाठी काही सेकंदांची डेमो क्लिप पाठवली जात होती. त्यानंतर क्यूआर कोडद्वारे २०० ते ५०० रुपयांपर्यंत पैसे स्वीकारून संबंधित सामग्री पुरवली जात असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. पोलिसांना आरोपींच्या बँक खात्यांमध्ये अशा स्वरूपाचे अनेक संशयास्पद व्यवहारही आढळले आहेत.

फार्मसीच्या विद्यार्थ्यावर यापूर्वी झालेल्या कारवाईनंतर आरोपींनी अनेक व्हिडिओ हटवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, सायबर तज्ज्ञांकडून हटवलेला डेटा पुन्हा रिकव्हर करण्याचे काम सुरू आहे. तसेच या घृणास्पद प्रकारासाठी आरोपींनी अलीकडेच नवीन टॅबही खरेदी केल्याची माहिती तपासातून समोर आली आहे.

सायबर गुन्ह्यांमधून झटपट पैसे कमावण्याच्या हव्यासापोटी काही तरुण गंभीर गुन्ह्यांकडे वळत असल्याचे या प्रकरणातून पुन्हा अधोरेखित झाले आहे. यापूर्वी सायबर गुन्हेगारांना बँक खाती भाड्याने देणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश झाला होता. आता बालकांशी संबंधित आक्षेपार्ह डिजिटल सामग्रीच्या प्रसारात स्थानिक तरुणांचा सहभाग समोर येत असल्याने हा अत्यंत चिंताजनक आणि गंभीर ट्रेंड असल्याची प्रतिक्रिया सायबर पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/KYaIrqX6xIM3SpZ1FYjFWw?s=cl&p=a&ilr=0

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

329 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क