छत्रपती संभाजीनगर : सामान पॅक करण्यासाठी मदतीच्या बहाण्याने एका 31 वर्षीय पीएचडी करणाऱ्या विद्यार्थिनीला क्वार्टरवर बोलावून तिच्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी बेगमपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव दीपक मधुकर भुक्तार (वय 35, रा. घाटी क्वार्टर, ह.मु. पडेगाव) असे आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणीची आरोपीशी सुमारे दोन महिन्यांपूर्वी एका सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे ओळख झाली होती. पुढे दोघांमध्ये मैत्री झाली. घाटी परिसरातील शासकीय क्वार्टरमध्ये राहणाऱ्या आरोपीला खोली रिकामी करण्याचे आदेश मिळाल्यानंतर त्याने 8 जुलै रोजी सामान पॅक करण्यासाठी पीडितेला मदतीसाठी बोलावले होते. त्या दिवशी रात्री उशीर झाल्याने ती तेथेच थांबली होती.
यानंतर 12 जुलै रोजी उर्वरित सामान पॅक करण्याचे कारण सांगून आरोपीने तिला पुन्हा क्वार्टरवर बोलावले. तक्रारीनुसार, रात्रीच्या वेळी आरोपीने तिच्यावर दोनदा अत्याचार केला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी तिला बळजबरीने एक गोळी खाऊ घातल्याचा आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे. त्यानंतर आरोपीने पीडितेला तिच्या समतानगर येथील राहत्या ठिकाणी सोडले.
या घटनेनंतर पीडित तरुणी मानसिक धक्क्यात गेली होती. बदनामीच्या भीतीमुळे तिने सुरुवातीला पोलिसांकडे तक्रार केली नाही. मात्र, धाडस एकवटून तिने 3 ऑगस्ट रोजी बेगमपुरा पोलीस ठाण्यात जाऊन घडलेला प्रकार सांगत तक्रार दाखल केली.
या तक्रारीवरून पोलिसांनी भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमांनुसार गुन्हा नोंदवून आरोपी दीपक भुक्तार याला अटक केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मनीषा केदार करत असून, पोलीस निरीक्षक प्रविणा यादव यांनी या घटनेला दुजोरा दिला आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/KYaIrqX6xIM3SpZ1FYjFWw?s=cl&p=a&ilr=0
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*