कन्नड/सिल्लोड : जिल्ह्यात गुरुवारी (दि. १७) दुपारी झालेल्या वादळी पावसाने दोन कुटुंबांवर मोठा आघात केला. कन्नड तालुक्यातील वाहुळखेडा (पिशोर) शिवारात झाडाखाली आसरा घेतलेल्या शेतमजुरांवर वीज कोसळल्याने तीन महिलांचा मृत्यू झाला. तर सिल्लोड तालुक्यातील दहिगाव येथे शेतातील झोपडीवर वीज कोसळून वृद्ध दाम्पत्याचा जागीच मृत्यू झाला. या दोन्ही दुर्घटनांमध्ये चार जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
कन्नड तालुक्यातील वाहुळखेडा शिवारातील गट क्रमांक ७१ परिसरात सहा शेतमजूर पिकाच्या काढणीसाठी गेले होते. दुपारी साडेदोनच्या सुमारास अचानक वातावरण बदलले आणि मुसळधार पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे सर्वांनी एका झाडाखाली आसरा घेतला. पाऊस कमी झाल्यानंतर ते परतण्याच्या तयारीत असतानाच त्याच झाडावर कडकडाटासह वीज कोसळली.
या दुर्घटनेत हमिदा सय्यद हमीद (४०), तस्लीम मुक्तार सय्यद (३९) आणि अलमिरा हनीफ सय्यद (१७) यांचा जागीच मृत्यू झाला. हाफिज खलील सय्यद (२५), अनिसा निसार सय्यद (३८) आणि फरजाना हमीद सय्यद (३५) हे गंभीर जखमी झाले. जखमींना पिशोर ग्रामीण रुग्णालयात दाखल केल्यानंतर पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात हलविण्यात आले.
दुसरी दुर्घटना सिल्लोड तालुक्यातील दहिगाव येथे घडली. मनोहर भिवसन दुधे (६०), पत्नी पर्वताबाई मनोहर दुधे (५७) आणि मुलगा पंढरीनाथ मनोहर दुधे (३०) हे शेतात उडीद-मुगाची सोंगणी करण्यासाठी गेले होते. पावसापासून बचाव करण्यासाठी तिघांनी झोपडीत आसरा घेतला; मात्र झोपडीवरच वीज कोसळल्याने मनोहर आणि पर्वताबाई यांचा मृत्यू झाला. पंढरीनाथ गंभीर जखमी असून त्याच्यावर सिल्लोड उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
घटनेची माहिती मिळताच प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या दुर्घटनांमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/EOeAE4QPeWR14rmQMaPbCz?s=cl&p=a&mlu=4&ilr=4
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*