छत्रपती संभाजीनगर : बहिणीशी लग्न लावून न दिल्याच्या रागातून २२ वर्षीय तरुणाची भरदिवसा पोटात चाकू भोसकून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना हर्सूल परिसरातील कोलठाणवाडी रोडवरील करीमनगर येथे शुक्रवारी दुपारी घडली. हल्लेखोरांनी तरुणाच्या पोटात चाकू खुपसून तो तसाच सोडून घटनास्थळावरून पळ काढला. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.
मोहंमद फैसल अब्दुल कादर शेख (२२, रा. उमर कॉलनी, हर्सूल, मूळ रा. किराडपुरा) असे मृत तरुणाचे नाव आहे. रेहान अमीन पटेल (२५) आणि समीर रईस शेख अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत फैसलचा भाऊ शेख मुस्ताकीम याने तक्रार दिली आहे.
फैसल हा कोलठाणवाडी रोडवर मेडिकल दुकान चालवत होता. पाच-सहा महिन्यांपूर्वी आरोपी रेहानने फैसलच्या बहिणीशी लग्न करण्याचा प्रस्ताव दिला होता. मात्र, रेहानचा स्वभाव आणि तो कोणतेही कामधंदे करीत नसल्याने कुटुंबीयांनी हा प्रस्ताव नाकारला. त्यानंतर फैसलच्या बहिणीचे दुसरीकडे लग्न लावून देण्यात आले. याचा राग रेहानच्या मनात होता. तो फैसलच्या घरासमोर तसेच मेडिकल दुकानासमोरून बुलेटचा मोठा आवाज करत दहशत निर्माण करीत असल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
दरम्यान, दोन दिवसांपूर्वी फैसलच्या मेडिकल दुकानाला अचानक आग लागली होती. ही आग रेहानने लावल्याचा संशय फैसल आणि त्याच्या कुटुंबीयांना होता. याच कारणावरून जाब विचारण्यासाठी शुक्रवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास रेहान आणि समीर मेडिकलवर गेले. तेथे वाद वाढून हाणामारी झाली. त्यानंतर रेहानने फैसलच्या पोटात चाकू भोसकला.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. विशेष पथकाने सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींची ओळख पटवली आणि फुलंब्री तालुक्यातील नातेवाइकांच्या घरातून दोघांना ताब्यात घेतले. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक सचिन सदाफुले करीत आहेत.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/EOeAE4QPeWR14rmQMaPbCz?s=cl&p=a&mlu=4&ilr=4
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*