छत्रपती संभाजीनगर : गणरायाच्या आगमनानिमित्त सोमवारी (दि. १४) शहरातील बाजारपेठा आणि प्रमुख रस्त्यांवर भाविकांची मोठी गर्दी उसळली होती. मात्र, या गर्दीचा फायदा घेत मोबाईल चोर आणि सोनसाखळी चोरट्यांनी चांगलाच धुमाकूळ घातला. शहरातील विविध भागांतून तब्बल ४० हून अधिक मोबाईल चोरीला गेल्याची प्राथमिक माहिती असून, सहा महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्रही चोरट्यांनी लंपास केले.
शहरातील मुख्य बाजारपेठा, टीव्ही सेंटर, क्रांती चौक यांसह गर्दीच्या ठिकाणी चोरट्यांनी हातसफाईचे कसब दाखवले. सिटी चौक पोलिस ठाण्याच्या हद्दीत चार मोबाईल चोरीला गेले. यापैकी एका चोरट्याला नागरिकांनी रंगेहाथ पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली असून, त्याच्या ताब्यातून दोन मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. मोबाईल चोरीची तक्रार देण्यासाठी सात ते आठ नागरिक पोलिस ठाण्यात पोहोचल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
सिडको पोलिस ठाण्याच्या हद्दीतील टीव्ही सेंटर परिसरातही गर्दीचा फायदा घेत अनेकांचे मोबाईल चोरीला गेले. मात्र, प्रत्यक्ष चोरीच्या घटनांच्या तुलनेत पोलिसांकडे नोंद झालेल्या तक्रारींची संख्या कमी आहे. रात्री उशिरापर्यंत केवळ तीन जणांनी मोबाईल चोरीची तक्रार नोंदवली.
क्रांती चौक परिसरातील एसबी महाविद्यालय रोड आणि झेडपी मैदान परिसरात गणपती पाहण्यासाठी आलेल्या अंदाजे आठ ते दहा जणांचे मोबाईल गर्दीतून लंपास करण्यात आल्याची माहिती आहे.
दरम्यान, मुकुंदवाडी परिसरात तीन महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र कापून नेण्यात आले. तर जवाहरनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत गजानन महाराज मंदिर परिसरासह गर्दीच्या ठिकाणी दर्शनासाठी आलेल्या आणखी तीन महिलांचे मंगळसूत्र चोरट्यांनी शिताफीने लंपास केले. त्यामुळे गणेशोत्सवाच्या गर्दीत नागरिकांनी मोबाईल आणि मौल्यवान दागिन्यांची विशेष काळजी घेण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/EOeAE4QPeWR14rmQMaPbCz?s=cl&p=a&mlu=4&ilr=4
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*