वाळूज महानगर : घरी कोणीही नसल्याची संधी साधत दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी दिवसा शिक्षकाचे घर फोडून सुमारे तीन ते साडेतीन तोळे सोन्याचे दागिने लंपास केले. अवघ्या पंधरा मिनिटांत ही चोरी करून चोरटे दुचाकीवरून पसार झाले. चोरीची ही घटना बुधवारी (दि. ९) दुपारी सिडको वाळूज महानगर-१ येथील सारा ग्रीन सोसायटीत घडली. चोरीनंतर पसार होताना दोन्ही चोरटे सोसायटीतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत.

अविनाश सुरडकर हे सारा ग्रीन सोसायटीतील विंग क्रमांक २ मधील फ्लॅट क्रमांक १० मध्ये पत्नी व मुलीसह राहतात. ते कला शिक्षक असून त्यांची पत्नी एका कंपनीत काम करतात. बुधवारी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास सुरडकर नेहमीप्रमाणे शाळेत गेले. त्यानंतर सकाळी साडेनऊच्या सुमारास त्यांच्या पत्नीने घराला कुलूप लावून कामावर प्रस्थान केले. मुलगीही आजीकडे गेल्याने घरात कोणीही नव्हते.

हीच संधी साधून दुपारी सुमारे २.५० वाजता दुचाकीवरून दोन चोरटे सोसायटीत दाखल झाले. त्यांनी कटरच्या सहाय्याने घराच्या दरवाजाचे कुलूप तोडले आणि घरात प्रवेश केला. घरातील कपाट व साहित्याची नासधूस करून चोरट्यांनी कपाटातील सोन्याचे दागिने चोरून नेले. अवघ्या पंधरा मिनिटांत चोरी उरकून दोन्ही चोरटे दुचाकीवरून पसार झाले.

दरम्यान, सुरडकर यांना चोरीची माहिती मिळताच त्यांनी पोलिसांना कळविले. एमआयडीसी वाळूज पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. पोलिसांनी सोसायटीतील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता दुचाकीवरून आलेले दोन्ही चोरटे त्यात स्पष्टपणे कैद झाल्याचे समोर आले. या फुटेजच्या आधारे पोलिसांकडून चोरट्यांचा शोध सुरू आहे. दिवसा सोसायटीत घरफोडी झाल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/EOeAE4QPeWR14rmQMaPbCz?s=cl&p=a&mlu=4&ilr=4

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

458 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क