छत्रपती संभाजीनगर : कंपनीच्या मालकाच्या नावाने व्हॉट्सअॅपवर बनावट संदेश पाठवून शहरातील एका बांधकाम व्यावसायिकाच्या कंपनीला सायबर भामट्यांनी तब्बल ५० लाख रुपयांचा फटका दिला. धक्कादायक म्हणजे, पहिल्या व्यवहारानंतरही भामट्यांनी न थांबता आणखी ३६ लाख रुपयांची मागणी केली. यामुळे कंपनीच्या व्यवस्थापकाला संशय आला आणि तोपर्यंत झालेली मोठी आर्थिक फसवणूक समोर आली.
सिडकोतील ‘भरूका कन्स्ट्रक्शन’चे व्यावसायिक राजेश भरूका कमलनयन (५९) यांच्या कंपनीतील व्यवस्थापक अशोक सपाटे यांना ३ सप्टेंबर रोजी सकाळी व्हॉट्सअॅपवर संदेश मिळाला. हा संदेश कंपनीच्या मालकाच्या मोबाइल क्रमांकावरून आल्याने त्यांना संशय आला नाही. दिल्लीतील एका कंपनीच्या बँक खात्यावर तातडीने ५० लाख रुपये आरटीजीएस करण्याच्या सूचना त्यात देण्यात आल्या होत्या.
वरिष्ठांचा आदेश असल्याचे समजून व्यवस्थापकाने अॅक्सिस बँकेमार्फत संबंधित खात्यावर रक्कम पाठवली. व्यवहार झाल्यानंतर काही वेळातच पुन्हा एक संदेश आला. यावेळी ३६ लाख रुपये तातडीने पाठविण्यास सांगण्यात आले. सतत पैशांची मागणी होत असल्याने सपाटे यांनी थेट मालकाशी संपर्क साधला. मात्र, आपण असा कोणताही मेसेज पाठवला नसल्याचे मालकाने स्पष्ट केले.
त्यानंतर कंपनीला सायबर फसवणुकीचा प्रकार लक्षात आला. बँकेशी संपर्क साधून पैसे रोखण्याचा प्रयत्न करण्यात आला; मात्र ५० लाख रुपये संबंधित खात्यात पोहोचले होते. भामट्यांनी ही रक्कम काही वेळातच तब्बल १४ वेगवेगळ्या खात्यांमध्ये वळवली. सायबर पोलिसांनी तातडीने काही खाती गोठविल्याने त्यातील मोठी रक्कम सुरक्षित करण्यात यश आले.
या प्रकरणी ७ सप्टेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक शेषराव खटाणे तपास करीत आहेत.
‘बॉस स्कॅम’पासून सावध राहण्याचे आवाहन
सायबर गुन्हेगारांकडून वापरली जाणारी ही पद्धत ‘सीईओ फ्रॉड’ किंवा ‘बिझनेस ई-मेल कॉम्प्रोमाईज’ म्हणूनही ओळखली जाते. वरिष्ठ अधिकाऱ्याच्या नावाने बनावट खाते किंवा संदेश तयार करून कर्मचाऱ्यांकडून तातडीने मोठ्या रकमेचे व्यवहार करून घेतले जातात.
कंपनीच्या नावाने किंवा वरिष्ठांच्या नावाने अचानक मोठ्या रकमेची मागणी झाल्यास केवळ मेसेजवर विश्वास न ठेवता संबंधित व्यक्तीशी थेट फोनवर संपर्क साधून खात्री करावी. नवीन बँक खात्यावर पैसे पाठवण्यापूर्वी खात्याची पडताळणी करावी. आर्थिक फसवणूक झाल्यास विलंब न करता १९३० या सायबर हेल्पलाईनवर संपर्क साधणे आवश्यक आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/KYaIrqX6xIM3SpZ1FYjFWw?s=cl&p=a&ilr=0
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*