छत्रपती संभाजीनगर : गोदामातील एलईडी टीव्ही आणि टीव्हीचे सुटे भाग चोरून परस्पर विक्री करणाऱ्या तीन नोकरांना जवाहरनगर पोलिसांनी अटक केली. आरोपींकडून चोरीचे 122 एलईडी टीव्ही, सुटे भाग आणि गुन्ह्यात वापरलेले वाहन असा एकूण 44 लाख 44 हजार 977 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सन 2024 पासून सुरू असलेल्या या चोरीचा पोलिसांनी छडा लावला.

याप्रकरणी रविंद्रसिंह जसवंतसिंह जोहर यांनी जवाहरनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. सिंधी कॉलनी परिसरातील त्यांच्या गोदामातून तसेच अन्य ठिकाणाहून IAIR कंपनीचे वेगवेगळ्या आकाराचे एलईडी टीव्ही आणि काही सुटे भाग चोरीला जात असल्याचे निदर्शनास आले होते. 25 ऑगस्ट रोजी तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली.

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपास पथक तयार करण्यात आले. पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे मनीष दिलीप नरवडे (26), अकबर शेख मोहम्मद अली शेख (55) आणि राजेंद्रकुमार फुलचंद परदेशी (53) या तिघांना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्यांनी चोरीची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

पोलिस तपासात धक्कादायक माहिती समोर आली. आरोपी सन 2024 पासून गोदामातून एक-दोन टीव्ही अशा पद्धतीने चोरी करत होते. त्यानंतर चोरीचे टीव्ही छत्रपती संभाजीनगर शहर व ग्रामीण भागासह जालना आणि नाशिक परिसरात ओळखीच्या व्यक्तींमार्फत कमी किमतीत विकले जात होते.

आरोपींकडून पोलिसांनी आतापर्यंत 122 एलईडी टीव्ही आणि सुटे भाग हस्तगत केले असून, चोरीच्या मालाची पुढील विक्री तसेच या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास सुरू आहे.

ही कारवाई पोलिस आयुक्त प्रवीण पवार, पोलिस उपआयुक्त रत्नाकर नवले आणि अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली जवाहरनगर पोलिसांच्या विशेष तपास पथकाने केली.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/KYaIrqX6xIM3SpZ1FYjFWw?s=cl&p=a&ilr=0

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

355 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क