छत्रपती संभाजीनगर : दारू पिण्यासाठी पैसे दिले नाहीत, या क्षुल्लक कारणावरून एका नशेखोर तरुणाने ७५ वर्षीय दिव्यांग भिक्षेकऱ्याची त्यांच्याच वॉकरने डोके ठेचून निघृण हत्या केल्याची धक्कादायक घटना टीव्ही सेंटर परिसरात घडली. रविवारी (६ सप्टेंबर) मध्यरात्री मनपाच्या झोन कार्यालयाच्या गेटसमोर हा प्रकार घडला. या प्रकरणी गुन्हे शाखेने अकबर ऊर्फ बंटी अजीम पठाण (२३, रा. रशीदपुरा) याला ताब्यात घेतले असून, सिडको पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत भिक्षेकरी गेल्या काही महिन्यांपासून टीव्ही सेंटर येथील मनपा झोन कार्यालयाच्या गेटसमोर बसत होते. आरोपी अकबर हा परिसरात नशापाणी करण्यासाठी भटकत असायचा. रविवारी रात्री त्याने भिक्षेकऱ्याकडे दारूसाठी पैशांची मागणी केली. मात्र, पैसे नसल्याने दोघांमध्ये वाद झाला. संतापलेल्या अकबरने भिक्षेकऱ्याचा आधार असलेला वॉकर हिसकावून घेतला आणि त्याने त्यांच्या डोक्यात व हातावर जोरदार प्रहार केले. गंभीर जखमी झाल्याने भिक्षेकऱ्याचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाला.
सोमवारी सकाळी पोलिसांना घटनेची माहिती मिळाल्यानंतर उपायुक्त रत्नाकर नवले, सिडको पोलिस ठाण्याचे निरीक्षक अतुल येरमे व उपनिरीक्षक अनिल नाणेकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर आरोपीची ओळख पटली. त्यानंतर गुन्हे शाखेचे एपीआय अमोल देशमुख यांच्या पथकाने पंचायत समिती परिसरातून अकबरला ताब्यात घेतले.
विशेष म्हणजे, २०२२ मध्ये टीव्ही सेंटर मैदानातील एका गाळ्यात सिद्धार्थ साळवे (३६) यांची दारूच्या वादातून दगडाने ठेचून हत्या झाली होती. पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह जाळण्याचा प्रयत्नही झाला होता. या प्रकरणात अकबर आरोपी होता; मात्र तपासादरम्यान तो पोलिसांचा ‘माफीचा साक्षीदार’ बनला होता. आता चार वर्षांनंतर पुन्हा खुनाच्या गुन्ह्यात तो गजाआड गेला आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/KYaIrqX6xIM3SpZ1FYjFWw?s=cl&p=a&ilr=0
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*