छत्रपती संभाजीनगर : गणरायाच्या आगमनाचा उत्साह सुरू असतानाच पिंपरी राजा येथे सोमवारी रात्री भीषण अपघात झाला. भरधाव कंटेनर मिरवणुकीच्या गर्दीत घुसल्याने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू झाला, तर पाच वर्षांच्या चिमुकल्यासह १२ जण जखमी झाले. विठ्ठल रामभाऊ जाधव (४५) आणि रमेश लहूजी बनसोडे (४५, रा. पिंपरी राजा) अशी मृतांची नावे आहेत. या घटनेमुळे गणेशोत्सवाच्या आनंदावर शोककळा पसरली.

पिंपरी राजा येथे सोमवारी रात्री सव्वाआठच्या सुमारास गणपती आगमनाची तयारी सुरू होती. चिकलठाणा येथून आणलेल्या गणेशमूर्तीची गावाच्या वेशीवरून मिरवणूक काढण्याची तयारी सुरू होती. तिसऱ्या गणपतीची मूर्ती असलेल्या पिकअप वाहनात सुमारे २० ते २५ तरुण उपस्थित होते. त्याचवेळी चितेगावकडून आलेल्या कंटेनरने (एमएच २१ बीएच ७४१६) गतिरोधकावर जोरदार धडक दिली. त्यानंतर चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने कंटेनर थेट मिरवणुकीच्या गर्दीत घुसला.

कंटेनरच्या धडकेत ट्रॅक्टर, पिकअप वाहन आणि दुचाकींचे नुकसान झाले. प्रसंगावधान राखत पिकअपमधील तरुणांनी बाजूला धाव घेतल्याने मोठी जीवितहानी टळली. मात्र, विठ्ठल जाधव आणि रमेश बनसोडे यांना गंभीर दुखापत झाली. उपचारादरम्यान दोघांचा मृत्यू झाला.

विठ्ठल जाधव दिवसभर शेतात काम करून घरी परतत असताना मिरवणूक पाहण्यासाठी थांबले होते. रमेश बनसोडेही काम आटोपून घरी जाताना तेथे थांबले होते. काही क्षणांतच गणरायाच्या स्वागताचा जल्लोष आक्रोशात बदलला.

अपघातात हर्षवर्धन गणेश पवार (५) याच्यासह १२ जण जखमी झाले आहेत. काही जखमींवर खासगी रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. कैलास अण्णा ढेकळे आणि विष्णू गणेश राजने यांना उपचारानंतर सुटी देण्यात आली.

कंटेनरचालक किशोर अण्णासाहेब घुले (३६, रा. कारखेल, ता. आष्टी, जि. बीड) हादेखील जखमी झाला. पोलिसांनी त्याची जमावाच्या तावडीतून सुटका केली. ‘ब्रेक लावण्याचा प्रयत्न केला; मात्र कंटेनर थांबला नाही,’ असा दावा चालकाने केला. प्रत्यक्षदर्शी आणि जखमींचे जबाब नोंदवल्यानंतर अपघाताचे नेमके कारण स्पष्ट होईल, असे पोलिसांनी सांगितले.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/EOeAE4QPeWR14rmQMaPbCz?s=cl&p=a&mlu=4&ilr=4

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

859 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क