छत्रपती संभाजीनगर : गणेशोत्सवाच्या काळात निर्माण होणारे निर्माल्य जलस्रोतांमध्ये टाकले जाऊ नये आणि शहरातील पर्यावरणाचे संरक्षण व्हावे, यासाठी छत्रपती संभाजीनगर महापालिकेने विशेष नियोजन केले आहे. उत्सवाच्या दहा दिवसांत निर्माल्य संकलनासाठी सहा विशेष गाड्या तैनात करण्यात येणार असून, गणेश विसर्जनाच्या दिवशी तब्बल ५० गाड्यांच्या माध्यमातून निर्माल्य जमा केले जाणार आहे. तसेच शहरातील विहिरी आणि कृत्रिम विसर्जन तलावांच्या परिसरात ६० निर्माल्य कलश ठेवण्यात येणार आहेत.
महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या वतीने ही संकलन व्यवस्था राबविण्यात येत आहे. गणेशोत्सवादरम्यान मोठ्या प्रमाणात हार, फुले आणि पूजेसाठी वापरलेले साहित्य निर्माल्याच्या स्वरूपात जमा होते. हे साहित्य नदी, नाले, विहिरी किंवा इतर जलस्रोतांमध्ये विसर्जित केल्यास जलप्रदूषणाचा धोका निर्माण होतो. ही बाब लक्षात घेऊन महापालिकेने निर्माल्य संकलन आणि त्यावर प्रक्रिया करण्याची स्वतंत्र व्यवस्था केली आहे.
निर्माल्यापासून तयार होणार सेंद्रिय खत
नागरिकांकडून संकलित केलेले निर्माल्य हर्सूल येथील प्रक्रिया केंद्रावर नेण्यात येणार आहे. येथे त्यावर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया करून सेंद्रिय खत तयार केले जाईल. या खताचा वापर पर्यावरणपूरक उपक्रमांसाठी करण्यात येणार असून, ‘आमचा बाप्पा स्वच्छतेचा राजा’ या उपक्रमात सहभागी झालेल्या गणेश मंडळांना ते वितरित केले जाणार आहे.
महापौर समीर राजूरकर आणि महापालिका आयुक्त अमोल येडगे यांच्या मार्गदर्शनाखाली, उपायुक्त नंदकिशोर भोंबे यांच्या नियोजनातून ही व्यवस्था कार्यान्वित करण्यात आली आहे.
निर्माल्य पाण्यात टाकू नका!
गणेशभक्तांनी पूजेनंतरचे हार, फुले आणि अन्य निर्माल्य थेट जलस्रोतांमध्ये न टाकता जवळच्या निर्माल्य कलशात जमा करावे, असे आवाहन महापालिकेने केले आहे. नागरिकांच्या सहभागातून निर्माल्याचे योग्य व्यवस्थापन करून जलप्रदूषण रोखण्यासोबतच स्वच्छ आणि पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचा महापालिकेचा प्रयत्न आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/EOeAE4QPeWR14rmQMaPbCz?s=cl&p=a&mlu=4&ilr=4
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*