छत्रपती संभाजीनगर : कंपनीच्या मालकाच्या नावाने व्हॉट्सअॅपवर आलेल्या बनावट मेसेजवर विश्वास ठेवून कंपनीच्या कॅशियरने तब्बल ३ कोटी ७० लाख रुपये दोन बँक खात्यांवर आरटीजीएसद्वारे वर्ग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. व्हॉट्सअॅपच्या डीपीवर मालकाच्या मुलीचा फोटो असल्याने कॅशियरने कोणतीही खातरजमा न करता पैसे पाठवले. मात्र, मालकाने असा कोणताही मेसेज पाठवला नसल्याचे स्पष्ट केल्यानंतर फसवणूक झाल्याचे उघड झाले. ही घटना १४ ते १५ सप्टेंबरदरम्यान गारखेडा परिसरातील आदित्यनगर येथे घडली.
या प्रकरणी दोन बँक खातेधारकांसह एका मोबाइलधारकाविरुद्ध जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिगंबर माने (४२, रा. लक्ष्मीनगर, बजाजनगर) हे आदित्यनगरातील एस. डी. दवंडे इन्फ्रा प्रा. लि. कंपनीत अकाउंटंट म्हणून कार्यरत आहेत. कंपनीच्या आर्थिक व्यवहारांसाठी स्वतंत्र व्हॉट्सअॅप ग्रुप तयार करण्यात आला आहे. कंपनीचे संचालक संदेश दवंडे कामानिमित्त बाहेरगावी असल्याने त्यांनी स्वाक्षरी केलेले धनादेश, स्लिप आणि आरटीजीएस फॉर्म कार्यालयात ठेवले होते.
१४ सप्टेंबर रोजी सकाळी माने यांच्या मोबाइलवर कंपनीच्या सर्व बँक खात्यांचे बॅलन्स तपासून स्क्रीनशॉट पाठवण्याचा मेसेज आला. डीपीवर मालकाच्या मुलीचा फोटो असल्याने माने यांनी मेसेज खरा समजला. त्यानंतर लखनौ येथील एसकेवाय पे प्रायव्हेट लिमिटेडच्या खात्यावर १ कोटी ७० लाख रुपये, तर पाटणा येथील आरएमआरएस जन कल्याण हॉस्पिटल प्रा. लि.च्या खात्यावर २ कोटी रुपये आरटीजीएसने पाठवले.
पुन्हा २ कोटी रुपये पाठवण्याचा मेसेज आल्यानंतर माने यांना संशय आला. त्यांनी बँक व्यवस्थापकांशी संपर्क साधून व्यवहार थांबवण्याची विनंती केली. बँकेने संबंधित बँकेला ई-मेलद्वारे माहिती दिली. फसवणूक लक्षात आल्यानंतर सायबर पोलिसांकडे तक्रार करण्यात आली. पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक सचिन कुंभार करीत आहेत.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/EOeAE4QPeWR14rmQMaPbCz?s=cl&p=a&mlu=4&ilr=4
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*