छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यातील सर्वात मोठे शासकीय रुग्णालय असलेल्या घाटी रुग्णालय परिसरात उपचारासाठी आलेल्या २० वर्षीय तरुणीवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तरुणीने धाडसाने प्रतिकार करत एका आरोपीच्या हाताचा कडाडून चावा घेतल्याने त्याचा डाव उधळला. या प्रकरणी बेगमपुरा पोलिसांनी अवघ्या २४ तासांत दोन्ही आरोपींना अटक केली.

रोहन जगदिश रिडलॉन (वय २४, रा. मुंबई) आणि विशाल प्रकाश चावरिया (रा. घाटी क्वार्टर्स, छत्रपती संभाजीनगर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पीडित तरुणी मूळची वैजापूरची रहिवासी आहे.

पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार, १८ सप्टेंबर रोजी रात्री रिक्षाला अचानक ब्रेक लागल्याने तरुणीच्या उजव्या डोळ्याला मीटरचा मार बसला होता. डोळ्याचा त्रास वाढल्याने ती १९ सप्टेंबर रोजी पहाटे तीनच्या सुमारास घाटी रुग्णालयात उपचारासाठी गेली. डॉक्टरांनी तिला पुढील तपासणीसाठी वॉर्ड क्रमांक १५ आणि त्यानंतर वॉर्ड क्रमांक ११ मध्ये जाण्यास सांगितले.

वॉर्डकडे जात असताना आरोपींनी रस्ता दाखवण्याच्या बहाण्याने तिला एसएसबी इमारतीजवळ नेले. तेथे मारहाण करून आणि धमकी देऊन तिला जबरदस्तीने स्कुटीवर बसवले. त्यानंतर एका पडक्या इमारतीच्या टेरेसवर नेण्यात आले. तेथे रोहनने तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तरुणीने आरडाओरड करत त्याच्या हाताचा जोरात चावा घेतला. त्यामुळे घाबरलेल्या आरोपीने तिला सोडले आणि ती तेथून पळून गेली.

त्यानंतर तरुणीने बेगमपुरा पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. पोलीस निरीक्षक प्रविणा यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तपास सुरू केला. विशालला जुबली पार्क परिसरातून ताब्यात घेण्यात आले. तर मुंबईला पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या रोहनला जालना मध्यवर्ती बसस्थानकातून अटक करण्यात आली. जनशताब्दी एक्स्प्रेसने मुंबईला जाण्यापूर्वीच पोलिसांनी त्याला पकडले.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/EOeAE4QPeWR14rmQMaPbCz?s=cl&p=a&mlu=4&ilr=4

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

1,178 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क