छत्रपती संभाजीनगर : शहरात मोटारसायकल चोरीच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी केलेल्या कारवाईत दुचाकी चोरणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली आहे. आरोपींकडून तब्बल १२ मोटारसायकली जप्त करण्यात आल्या असून, या कारवाईत सुमारे ९ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. ही कारवाई छत्रपती संभाजीनगर शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेने केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून मोटारसायकली चोरीला जाण्याच्या घटना घडल्या होत्या. या प्रकरणांचा तपास सुरू असताना गुन्हे शाखेच्या पथकाला गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत संशयितांचा शोध घेतला.
या प्रकरणात कृष्णा नारायण मुरडक (वय ३०) आणि शेख कलीम शेख जब्बार (वय २२), दोघेही रा. बालसावंगी, ता. भोकरदन, जि. जालना, यांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान त्यांनी शहरातील विविध भागांतून मोटारसायकली चोरी केल्याची माहिती समोर आली.
पोलिसांनी आरोपींकडून एकूण १२ मोटारसायकली जप्त केल्या आहेत. यामध्ये शहरातील हर्सूल, सिडको तसेच इतर पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून चोरीला गेलेल्या दुचाकींचा समावेश आहे. जप्त करण्यात आलेल्या मोटारसायकलींची किंमत अंदाजे ९ लाख २० हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.
या कारवाईमुळे दुचाकी चोरीचे अनेक गुन्हे उघडकीस आले असून, आणखी काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त प्रवीण पवार, पोलीस उपायुक्त रत्नाकर नवले आणि सहायक पोलीस आयुक्त मनोज पगारे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. गुन्हे शाखेच्या पथकाने तपास करून आरोपींना अटक केली.
शहरात वाहन चोरीच्या घटनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांकडून विशेष लक्ष दिले जात असून, नागरिकांनी आपली वाहने सुरक्षित ठिकाणी उभी करावीत आणि वाहनांना लॉक लावण्याची काळजी घ्यावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/EOeAE4QPeWR14rmQMaPbCz?s=cl&p=a&mlu=4&ilr=4
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*