छत्रपती संभाजीनगर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसंदर्भात दाखल करण्यात आलेल्या अपील अर्जांवरील सुनावणी शुक्रवारी पूर्ण झाली. या सुनावणीत दाखल झालेल्या १० अपीलपैकी ९ अपील मंजूर करण्यात आली असून संबंधित उमेदवारांचे उमेदवारी अर्ज पात्र ठरविण्यात आले आहेत. तर गंगापूर तालुक्यातील इंदुमती साहेबराव पाटील यांचा अर्ज फेटाळण्यात आल्याने त्यांना निवडणूक प्रक्रियेतून बाहेर पडावे लागणार आहे.

या निर्णयामुळे निवडणुकीच्या राजकारणात मोठी हालचाल निर्माण झाली आहे. विशेषतः राज्याचे माजी मंत्री व आमदार अब्दुल सत्तार यांचे पुत्र अब्दुल समीर सत्तार यांचा उमेदवारी अर्ज पात्र ठरल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. तसेच कन्नड विधानसभा मतदारसंघाच्या आमदार संजना उर्फ रंजना जाधव यांच्याही अर्जाला मंजुरी मिळाल्याने त्यांनाही मोठा दिलासा मिळाला आहे.

निवडणूक प्रक्रियेदरम्यान काही उमेदवारांचे अर्ज विविध कारणांमुळे अपात्र ठरविण्यात आले होते. त्यानंतर संबंधित उमेदवारांनी अपील दाखल केले होते. या अपीलांवर सुनावणी झाल्यानंतर निवडणूक अधिकाऱ्यांनी बहुतेक उमेदवारांच्या बाजूने निर्णय दिला आहे.

दरम्यान, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक ही जिल्ह्यातील राजकीयदृष्ट्या अत्यंत प्रतिष्ठेची मानली जाते. विविध राजकीय गट आणि नेत्यांनी या निवडणुकीत आपली ताकद पणाला लावली आहे. त्यामुळे अपीलांवरील निर्णयानंतर निवडणुकीतील समीकरणे बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आगामी काळात उमेदवारांची अंतिम यादी जाहीर झाल्यानंतर प्रचाराला अधिक वेग येणार असून जिल्हा बँक निवडणुकीची रंगत आणखी वाढण्याची चिन्हे दिसत आहेत.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/IvoLcj6rZSSF1R9c7f0Ijh?s=cl&p=a&ilr=2

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

526 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क