छत्रपती संभाजीनगर : सुमारे ७०० कोटी रुपयांची उलाढाल असलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीने जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापवले आहे. या निवडणुकीत भाजप आणि शिवसेना आमनेसामने आल्याने महायुतीतील अंतर्गत मतभेद उघडपणे समोर आले आहेत. मनपा आणि जिल्हा परिषद निवडणुकांमधील अपयशानंतर शिवसेनेने ही निवडणूक प्रतिष्ठेची मानत पूर्ण ताकद पणाला लावली आहे. त्यामुळे पालकमंत्री संजय शिरसाट यांनीही थेट निवडणुकीच्या मैदानात सक्रिय भूमिका घेतली आहे.

मात्र, भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्री शिरसाट आणि नगरसेविका हर्षदा शिरसाट यांच्या उमेदवारीवर आक्षेप घेतल्याने महायुतीतील अंतर्गत संघर्ष अधिक तीव्र झाल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, उमेदवारी अर्ज छाननी प्रक्रियेत शिवसेनेला मोठा धक्का बसला असून आमदार संजना जाधव आणि समीर अब्दुल सत्तार यांचे अर्ज अवैध ठरले आहेत.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांची नुकतीच छाननी पार पडली. या प्रक्रियेत एकूण ४५ अर्ज अवैध ठरविण्यात आले. त्यामध्ये आमदार संजना जाधव, अब्दुल समीर सत्तार, माजी आमदार अण्णासाहेब माने तसेच सुवर्णा जाधव यांच्या अर्जांचा समावेश आहे. उमेदवारांनी दाखल केलेल्या आक्षेपांवर निवडणूक निर्णय अधिकारी समृत जाधव यांनी सुनावणी घेतल्यानंतर अंतिम निर्णय जाहीर केला.

या निवडणुकीत विद्यमान आणि माजी आमदार, माजी अध्यक्षांच्या पत्नी तसेच अनेक राजकीय दिग्गज मैदानात उतरल्याने निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही केवळ आर्थिक संस्था नसून ग्रामीण राजकारणाचा केंद्रबिंदू मानली जाते. बँकेमार्फत दरवर्षी सुमारे ७०० कोटी रुपयांचे कर्जवाटप केले जाते आणि त्याचा लाभ जिल्ह्यातील जवळपास एक लाख शेतकऱ्यांना मिळतो. त्यामुळे बँकेवरील नियंत्रण म्हणजे ग्रामीण मतदारांवरील प्रभाव मानला जातो. याच पार्श्वभूमीवर ही निवडणूक आगामी राजकीय समीकरणांसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/I6kWaCT1EMB7py0eVHlGdl

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

1,670 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क