छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परिसरात येत्या १० ऑगस्ट २०२६ पासून दुचाकी वाहनांसाठी हेल्मेट वापरणे पूर्णपणे अनिवार्य करण्यात आले आहे. या नव्या नियमांनुसार केवळ दुचाकी चालकानेच नव्हे, तर मागील आसनावर बसणाऱ्या प्रवाशानेही हेल्मेट परिधान करणे बंधनकारक असणार आहे. हेल्मेटशिवाय विद्यापीठ परिसरात कोणत्याही दुचाकीला प्रवेश दिला जाणार नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या निर्देशानुसार हा निर्णय घेण्यात आला असून, रस्ते अपघातांमधील मृत्यूंचे प्रमाण कमी करण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या ‘टारगेट झीरो फॅटलिटी डिस्ट्रिक्ट्स महाराष्ट्र’ या उपक्रमाचा तो एक भाग आहे. या उपक्रमांतर्गत अपघातातील प्राणघातक घटनांमध्ये किमान १० टक्के घट घडवून आणण्याचे उद्दिष्ट शासनाने निश्चित केले आहे.
राज्यातील सर्वाधिक अपघातग्रस्त ११ जिल्ह्यांमध्ये छत्रपती संभाजीनगरचा समावेश असल्यामुळे या नियमाची प्रभावी आणि कडक अंमलबजावणी करण्याचा निर्णय विद्यापीठ प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे हेल्मेट सक्तीच्या नियमाकडे दुर्लक्ष करणाऱ्यांना विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारावरच अडविण्यात येणार असून, त्यांना परिसरात प्रवेश दिला जाणार नाही.
हा नियम विद्यापीठातील सर्व शैक्षणिक व प्रशासकीय विभागांतील शिक्षक, शिक्षकेतर अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी तसेच विद्यापीठात विविध कामांसाठी येणारे अभ्यागत यांनाही समानपणे लागू राहणार आहे. हेल्मेटचा वापर हा केवळ नियम म्हणून नव्हे, तर प्रत्येकाच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
यासंदर्भात विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. प्रशांत अमृतकर यांनी अधिकृत परिपत्रक जारी केले असून, १० ऑगस्टपासून नियमाची काटेकोर अंमलबजावणी केली जाणार असल्याचे नमूद केले आहे. त्यामुळे विद्यापीठ परिसरात दुचाकीने येणाऱ्या सर्वांनी हेल्मेट वापरण्याची तयारी आतापासूनच करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/KYaIrqX6xIM3SpZ1FYjFWw?s=cl&p=a&ilr=0
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*