छत्रपती संभाजीनगर : महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौरपदाच्या निवडणुकीसाठी प्रशासकीय स्तरावर हालचालींना वेग आला असून, येत्या १० फेब्रुवारी रोजी ही निवड प्रक्रिया पार पडणार आहे. विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी या निवडणुकीसाठी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांची प्राधिकृत अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. त्यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी ११ वाजल्यापासून ही प्रक्रिया राबवली जाणार आहे.
विभागीय आयुक्तांनी जारी केलेल्या आदेशानुसार, १० फेब्रुवारी रोजी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले असून, याच सभेत महापौर आणि उपमहापौरपदासाठी निवड करण्यात येणार आहे. या निवडणुकीसाठी पीठासीन अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी दिलीप स्वामी काम पाहणार आहेत. मुंबई प्रांतिक महानगरपालिका (महापौर, उपमहापौर) निवडणूक नियम २००५ तसेच सुधारणा नियम २००६ मधील तरतुदीनुसार ही संपूर्ण प्रक्रिया पार पाडली जाणार आहे.
महानगरपालिकेच्या सत्ताकारणाच्या दृष्टीने ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. महापौर हे शहराचे प्रथम नागरिक म्हणून ओळखले जातात, त्यामुळे या पदावर कोणाची निवड होणार याकडे राजकीय वर्तुळासह सर्वसामान्य नागरिकांचे लक्ष लागले आहे. उपमहापौरपदाची निवडही तितकीच महत्त्वाची असून, आगामी काळात शहराच्या कारभारावर या नेतृत्वाचा मोठा प्रभाव राहणार आहे.
या निवडीबाबतचे अधिकृत पत्र जिल्हाधिकारी कार्यालय, महानगरपालिका आयुक्त तसेच नगरसचिव यांना पुढील कार्यवाहीसाठी पाठवण्यात आले आहे. निवडणूक प्रक्रिया पारदर्शक आणि नियमांनुसार पार पडावी, यासाठी प्रशासनाकडून आवश्यक ती तयारी सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान, विविध राजकीय पक्षांकडून हालचालींना वेग आला असून, संभाव्य उमेदवारांची नावे चर्चेत आहेत. संख्याबळ आणि राजकीय समीकरणांच्या आधारे कोणत्या पक्षाच्या उमेदवाराला महापौरपदाची संधी मिळणार, याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. १० फेब्रुवारी रोजी होणाऱ्या या निवडणुकीतून शहराच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब होणार असून, त्याचा परिणाम आगामी काळातील महानगरपालिकेच्या धोरणांवर दिसून येणार आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/IJbzVXxActY7zUsWoQ3lSr?mode=gi_t
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*