छत्रपती संभाजीनगर : महापालिका निवडणुकीदरम्यान प्रशासनाकडून वापरण्यात आलेल्या मार्कर पेनची शाई सॅनिटायझरने पुसली जात असल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर राज्यभर मोठा गोंधळ निर्माण झाला होता. या प्रकरणावरून निवडणूक आयोगावरही टीकेची झोड उठवण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी मार्कर पेनऐवजी लोकसभा व विधानसभा निवडणुकांप्रमाणे ‘म्हैसूर शाई’चा वापर करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आल्याची माहिती निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिली.
छत्रपती संभाजीनगर विभागातील छत्रपती संभाजीनगर, परभणी, लातूर आणि धाराशिव या चार जिल्ह्यांत जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका येत्या ५ फेब्रुवारी रोजी होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर शनिवारी (दि. २४) विभागीय आयुक्तालयात निवडणूक तयारीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. या बैठकीस विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर, राज्य निवडणूक आयोगाचे उपसचिव सूर्या कृष्णमूर्ती, छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, परभणीचे संजयसिंह चव्हाण, लातूरच्या वर्षा ठाकुर, धाराशिवचे कीर्ती किरण पुजार यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.
यावेळी आयुक्त वाघमारे यांनी वृद्ध, गरोदर महिला तसेच दिव्यांग मतदारांना मतदान प्रक्रिया सुलभ व्हावी यासाठी विशेष उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. संवेदनशील मतदान केंद्रांवर कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. जिल्ह्यांच्या सीमांवर नाकाबंदी, शहरी व ग्रामीण भागात विशेष पथकांची नियुक्ती करून कायदा व सुव्यवस्था राखण्यात येणार आहे.
मतदारसंख्येच्या प्रमाणात मतदान केंद्रे, ईव्हीएम मशीनची उपलब्धता, मतदान अधिकारी व कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण, स्ट्राँगरूमची सुरक्षा तसेच मतदार यादीतील दुबार नावे वगळण्याची कार्यवाही सुरू असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. निर्भय, पारदर्शक आणि शांततेत निवडणूक पार पाडण्यावर प्रशासनाचा भर असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/F4uD1Fqnz3sBgCKFsrOSDq
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*