छत्रपती संभाजीनगर महापालिकेसाठी महापौर पदाचे आरक्षण आत्ताच जाहीर झाले असून, यंदा हे पद खुल्या प्रवर्गासाठी राखीव असल्याचे स्पष्ट झाले आहे. या निर्णयामुळे महापालिकेच्या राजकारणात नव्या हालचालींना वेग आला असून, महापौरपदासाठी इच्छुक उमेदवारांमध्ये चढाओढ सुरू झाली आहे. गुरुवारी झालेल्या आरक्षण सोडतीनंतर लवकरच महापौर निवडीसाठी पहिली सर्वसाधारण सभा आयोजित केली जाण्याची शक्यता आहे. या सभेसाठी जिल्हाधिकारी पीठासन अधिकारी म्हणून काम पाहतील, अशी माहिती सूत्रांनी दिली.
दरम्यान, नवनिर्वाचित नगरसेवक व पदाधिकाऱ्यांना मिळणाऱ्या मानधनासह विविध सोयी-सुविधांचीही माहिती समोर आली आहे. क वर्ग महापालिकेनुसार नगरसेवकांना दरमहा १० हजार रुपये मानधन दिले जाणार असून, सर्वसाधारण सभेसाठी ४०० रुपये मीटिंग भत्ता मिळणार आहे. महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभापती, विरोधी पक्षनेता यांसह प्रमुख पदाधिकाऱ्यांना वाहन सुविधा देण्यात येणार आहे.
महापौरांना राज्यमंत्र्यांचा दर्जा असल्याने त्यांना अधिकृत वाहन उपलब्ध करून दिले जाईल. महापालिकेचे अधिकारी वापरत असलेलीच वाहने पदाधिकाऱ्यांना देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. स्वतःचे वाहन वापरायचे असल्यास महापौरांना दरमहा ३९ हजार रुपये, तर इतर पदाधिकाऱ्यांना ३७ हजार रुपये वाहन भत्ता दिला जाणार आहे. महापौर बंगल्यावर महापालिकेचे कर्मचारी नियुक्त राहतील तसेच गृहोपयोगी साहित्य आणि आवश्यक वस्तू मनपाच्या स्टोअर विभागाकडून पुरवण्यात येतील.
शहरात एकूण २९ प्रभाग असून, आता स्वेच्छा निधीची तरतूद बंद करण्यात आली आहे. पूर्वी पाच लाख रुपयांपर्यंत असलेला स्वेच्छा निधी आता देण्यात येणार नसून, प्रभाग पद्धतीनुसार प्रत्येक प्रभागासाठी विकासकामांसाठी ठराविक निधीची तरतूद अर्थसंकल्पात केली जाणार आहे. वर्षभरात याच निधीतून किमान तीन विकासकामे करावी लागणार असून, प्रभागाला किती निधी द्यायचा याचा धोरणात्मक निर्णय महापौर व स्थायी समिती सभापती घेणार आहेत.
महापौर पद खुल्या प्रवर्गासाठी राखीव झाल्याने सत्ताधारी व विरोधक दोन्ही गोटात हालचाली वाढल्या असून, आगामी निवडीकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/F4uD1Fqnz3sBgCKFsrOSDq
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*