छत्रपती संभाजीनगर : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत उमेदवारी वाटपावरून सर्वच प्रमुख राजकीय पक्षांत तीव्र बंडखोरी पाहायला मिळत आहे. युती आणि आघाडीच्या राजकारणात अनेक इच्छुकांचा पत्ता कट झाल्याने नाराज नेत्यांनी थेट पक्षत्याग करत बंडाचा झेंडा रोवला आहे. बुधवारी (दि. २१) उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असताना जिल्ह्याच्या राजकारणात मोठ्या उलथापालथी घडल्या.
भाजपचे तालुकाध्यक्ष तसेच छत्रपती संभाजीनगर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती राधाकिसन पठाडे यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत शिवसेना (शिंदेगट) मध्ये प्रवेश केला. लाडसावंगी गटातून उमेदवारी नाकारल्यानंतर त्यांनी हा निर्णय घेतला असून, त्यांच्या पक्षांतरामुळे भाजपला तालुकास्तरावर मोठा धक्का मानला जात आहे. याचबरोबर शिवसेना (ठाकरे गट) चे जिल्हाप्रमुख राजेंद्र राठोड यांनी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या नेतृत्वाखाली शिंदेगटात प्रवेश करत राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आणले आहे.
काँग्रेसमध्येही असंतोषाचा सूर तीव्र आहे. छत्रपती संभाजीनगर पश्चिम तालुकाध्यक्ष आणि माजी उपसभापती सर्जेराव चव्हाण यांनी काँग्रेसचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला. युवक काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष वरुण पाथ्रीकर यांनी काँग्रेसला रामराम ठोकत शिवसेना (ठाकरे गट) ची वाट धरली. पाथ्रीकर यांच्या समर्थकांनी फुलंब्री येथे काँग्रेसचे खासदार डॉ. कल्याण काळे यांच्या कार्यालयात तोडफोड केल्याची घटना घडली असून, त्यामुळे राजकीय वातावरण अधिकच तापले आहे.
काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मनोज शेजूळ यांनीही पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. तर आडगाव गटातून उमेदवारी नाकारल्याने भाजपचे पदाधिकारी अशोक नाबदे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. एकीकडे युती, आघाडीच्या समीकरणांतून उमेदवार ठरत असताना दुसरीकडे नाराज नेते पक्ष बदलत असल्याने सर्वच पक्षांना बंडखोरीचा सामना करावा लागत आहे.
दरम्यान, या बंडखोरीवर तोडगा काढण्यासाठी महायुतीची महत्त्वाची बैठक आज होणार आहे. भाजप २७ तर शिवसेना (शिंदेगट) २५ जागांवर निवडणूक लढवणार असल्याची माहिती मंत्री अतुल सावे यांनी दिली. काही ठिकाणी एकमेकांच्या उमेदवारांविरुद्ध बी-फॉर्म देण्यात आल्याचे प्रकार समोर आले असून, यावर भाजपच्या भूमिकेची प्रतीक्षा असल्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी स्पष्ट केले. या बैठकीनंतर बंडखोरी कितपत आटोक्यात येते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/F4uD1Fqnz3sBgCKFsrOSDq
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*