छत्रपती संभाजीनगर : शहरात सोन्याचा दर प्रति तोळा १ लाख ७० हजारांच्या पुढे गेल्याने सोनसाखळी चोरट्यांनी पुन्हा एकदा सक्रिय होऊन महिलांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. गुरुवारी सायंकाळी अवघ्या दोन तासांत, म्हणजेच दुपारी ४ ते सायंकाळी ६ या वेळेत, शहरातील वेगवेगळ्या भागांत दोन महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावण्याच्या घटना घडल्या. विशेष म्हणजे या दोन्ही घटना केवळ ४.१ किलोमीटरच्या अंतरात घडल्याने शहरातील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

पहिली घटना शिवाजीनगर परिसरातील वाणी मंगल कार्यालयाजवळ घडली. विजयश्री तेललवार (रा. शिवाजीनगर) या गुरुवारी दुपारी ४ वाजता किराणा दुकानात खरेदीसाठी गेल्या असता, दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांपैकी मागे बसलेल्या आरोपीने त्यांच्या गळ्यातील अडीच तोळ्यांचे सोन्याचे गंठण हिसकावून घेतले आणि क्षणात पोबारा केला. घटनेची माहिती मिळताच जवाहरनगर पोलिस ठाण्याचे निरीक्षक सचिन कुंभार, सहाय्यक निरीक्षक आतिष लोहकरे व उपनिरीक्षक मारोती खिल्लारे यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

यानंतर सायंकाळी सुमारे ६ वाजता मुकुंदवाडी परिसरातील एन-४ भागात दुसरी घटना घडली. वैशाली डबे या जिजाऊ चौक ते महालक्ष्मी चौक रस्त्यावरून पायी जात असताना दुचाकीस्वार चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील साखळी हिसकावण्याचा प्रयत्न केला. मात्र, ही साखळी बेंटेक्सची असल्याने चोरांच्या हाती मौल्यवान ऐवज लागला नाही आणि महिलेचे मोठे नुकसान टळले. या घटनेनंतर मुकुंदवाडी पोलिस ठाण्याचे निरीक्षक सचिन इंगोले व उपनिरीक्षक शिवाजी घोरपडे यांनी घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला.

दरम्यान, वैशाली डबे यांची साखळी हिसकावल्यानंतर एका जागरूक कार चालकाने चोरट्यांचा वेगात पाठलाग केला. रस्त्याच्या कडेला त्यांना अडवण्याचा प्रयत्न करण्यात आला; मात्र पकडले जाण्याच्या भीतीने चोरट्यांनी दुचाकी सोडून पळ काढला. तपासात दोन्ही घटनांमध्ये एकाच दुचाकीचा वापर झाल्याचे निष्पन्न झाले असून, ही दुचाकी जालन्यातील ढगे नावाच्या व्यक्तीची आहे. सदर दुचाकी बुधवारी रात्री जालन्यातील कदीम पोलिस ठाण्याच्या हद्दीतून चोरीला गेल्याची माहिती समोर आली आहे.

अवघ्या दोन तासांत दोन महिलांना लक्ष्य करण्यात आल्याने नागरिकांमध्ये अस्वस्थता वाढली असून, पोलिसांनी महिलांनी विशेष खबरदारी घ्यावी, तसेच संशयास्पद हालचाली दिसल्यास तात्काळ पोलिसांना कळवावे, असे आवाहन केले आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/IJbzVXxActY7zUsWoQ3lSr?mode=gi_t

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

834 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क