छत्रपती संभाजीनगर :  शहरात अमली पदार्थांचे सेवन आणि तस्करी मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. गुजरात व मुंबईमार्गे शहरात एमडी पावडरसारख्या महागड्या ड्रग्जची सर्रास तस्करी सुरू असल्याचे उघड झाले असून, गुन्हे शाखेने अवघ्या पाच दिवसांत तब्बल २० पेडलरचे जाळे उघडकीस आणले आहे. या कारवाईत एका सामान्य प्लंबरने ड्रग्ज विक्रीतून लाखोंची माया कमावल्याचे समोर आल्याने पोलिसही चक्रावले आहेत.

गुन्हे शाखेने बुधवारी शेख कलीम शेख सरदार (३५), अनिता पाचोंदे (२०), अविनाश पाचोंदे (२३, तिघे रा. रवींद्रनगर) आणि शेख मुस्ताक शेख ईसाक (२७, रा. एस. टी. कॉलनी) यांना अटक केली. कलीमच्या घरावर टाकलेल्या छाप्यात ५३.३२ ग्रॅम एमडी पावडर, ३.२६ लाख रुपये रोख, २४ कॅरेटचे ८ तोळ्यांचे सोन्याचे दागिने आणि सात महागडे मोबाइल जप्त करण्यात आले. हा सर्व मुद्देमाल ड्रग्ज विक्रीतून मिळाल्याचा पोलिसांचा संशय आहे.

शनिवारी गुन्हे शाखेने लातूर व उदगीर परिसरातून नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या औषधांची तस्करी करणाऱ्या शेख समीर राजासाब (२४), उमर अब्दुल साहाब शेख (३६) आणि सय्यद अल्ताफ वहाब (२३) यांना अटक करत त्यांच्या ताब्यातून ३,१२० औषधी बाटल्या जप्त केल्या. सोमवारी मेडिकल चालक सय्यद शाहीद अली सय्यद इब्राहिम अली (३०, रा. एस. टी. कॉलनी, उदगीर) यालाही अटक करण्यात आली.

या संपूर्ण रॅकेटचा मुख्य म्होरक्या अश्पाक पटेल (रा. चंपा चौक, शहाबाजार) सध्या पसार असून, त्याचा शोध सुरू आहे. अश्पाकने परिसरातील गोरगरिबांना पैशांचे आमिष दाखवून ड्रग्ज विक्रीसाठी एजंट बनवले होते. काम न केल्यास दुप्पट रक्कम वसूल करण्याची धमकी देत तो दबाव टाकत असल्याचेही तपासात निष्पन्न झाले आहे.

प्लंबर शेख कलीम हा अश्पाकचा जिवलग मित्र असून, तो महाविद्यालयीन विद्यार्थी आणि उच्चभ्रू पार्ट्यांमध्ये प्रती ४० मिलिग्रॅम एमडी ड्रग्ज अडीच ते तीन हजार रुपयांना विकत असल्याची कबुली त्याने दिली आहे. या प्रकरणात पोलिस निरीक्षक गजानन कल्याणकर, एपीआय विनायक शेळके, रविकांत गच्चे, अर्जुन कदम आणि पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली असून, पसार आरोपी व उर्वरित एजंटांचा शोध सुरू आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/IJbzVXxActY7zUsWoQ3lSr?mode=gi_t

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

709 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क