छत्रपती संभाजीनगर : कॅनॉट प्लेस परिसरात दोन टोळ्यांमध्ये झालेल्या सशस्त्र हाणामारी प्रकरणी सिडको पोलिसांनी कडक कारवाई करत बुधवारी (२८ जानेवारी) चार आरोपींची भर चौकात धिंड काढली. “परत जेलमध्ये जातो, पण याचा गेमच करतो” अशी खुलेआम धमकी देत परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या आरोपींवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे.
या कारवाईत कुख्यात आरोपी गौरव नानासाहेब वानखेडे (२४) आणि रोहन भगवान जाधव (२७, दोघे रा. त्रिवेणीनगर, एन-७) तसेच दामोदर बालाजी आघाव (१९) आणि राधेश्याम दिगंबर गिते (२२, दोघे रा. जयभवानीनगर) यांचा समावेश आहे. पोलिस निरीक्षक अतुल येरमे, सहायक पोलिस निरीक्षक योगेश गायकवाड, उपनिरीक्षक अनिल नाणेकर, कॉन्स्टेबल मंगेश पवार यांच्यासह पोलिस पथकाने ही धिंड काढली.
सायंकाळच्या पीक अवरमध्ये, तरुणाईचा मोठा वावर असलेल्या कॅनॉट प्लेस परिसरात ही धिंड काढण्यात आल्याने नागरिकांची मोठी गर्दी जमली होती. अनेक बघ्यांनी हा प्रकार आपल्या मोबाईलमध्ये चित्रित केला. या कारवाईमुळे परिसरात दहशत माजवणाऱ्या गुन्हेगारांना पोलिसांचा स्पष्ट इशारा मिळाल्याचे चित्र दिसून आले.
या प्रकरणाची पार्श्वभूमी अशी की, रविवारी किरकोळ कारणावरून विशाल खेत्रे आणि शैलेश घुगे यांच्या गटात चाकू व दांड्यांनी तुंबळ हाणामारी झाली होती. या राड्यात ३ ते ४ जण गंभीर जखमी झाले होते. घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
या घटनेप्रकरणी पवन गिते आणि विशाल खेत्रे यांनी दिलेल्या परस्परविरोधी तक्रारींच्या आधारे सिडको पोलिस ठाण्यात तब्बल २० जणांविरुद्ध खुनाचा प्रयत्न, दंगल, बेकायदेशीर जमाव आणि शस्त्रास्त्र वापर यासह गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अशा गुन्हेगारांविरोधात कठोर कारवाई सुरूच राहील, असा इशाराही पोलिसांनी दिला आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/IJbzVXxActY7zUsWoQ3lSr?mode=gi_t
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*