छत्रपती संभाजीनगर : शहरातील वाळूज परिसरात सराफावर प्राणघातक हल्ला करून लुटल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रांजणगाव फाटा येथे अज्ञात चोरट्यांनी पिस्तुलाचा वापर करत सोन्याची बॅग लंपास केल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेत सराफ संतोष सूर्यवंशी गंभीर जखमी झाले आहेत. 

मिळालेल्या माहितीनुसार, संतोष सूर्यवंशी हे वाळूज परिसरात सराफाचा व्यवसाय करतात. नेहमीप्रमाणे ते रात्री सुमारे ८.३० वाजता आपले दुकान बंद करून दुचाकीवरून घरी जात होते. रांजणगाव फाट्याजवळ पोहोचताच तीन अज्ञात चोरट्यांनी त्यांचा रस्ता अडवला. चोरट्यांनी त्यांच्या जवळील बॅग हिसकावण्याचा प्रयत्न केला. मात्र बॅग देण्यास त्यांनी विरोध केल्याने चोरट्यांपैकी एकाने जवळील पिस्तूल काढून त्यांच्या डोक्यावर जोरदार वार केला.

पिस्तुलाच्या वारामुळे संतोष सूर्यवंशी यांना चक्कर येऊन ते रस्त्यावर कोसळले. ही संधी साधून चोरट्यांनी सोन्याची बॅग उचलून घटनास्थळावरून पळ काढला. बॅगेत सुमारे तीन तोळे सोने, एक मोबाईल फोन असा एकूण साडेचार ते पाच लाख रुपयांचा मुद्देमाल असल्याची माहिती आहे. हल्ल्यात सूर्यवंशी यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्यांना चार टाके पडले आहेत.

घटनेनंतर जखमी अवस्थेत संतोष सूर्यवंशी यांनी संबंधित पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात करण्यात आली असून चोरट्यांचा शोध घेण्यासाठी विशेष पथके तयार करण्यात आली आहेत.

सराफावर थेट पिस्तुलाने हल्ला करून लूट केल्याची ही घटना गंभीर मानली जात असून, व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे. रात्रीच्या वेळी व्यापाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, पोलिसांनी लवकरात लवकर आरोपींना अटक करावी, अशी मागणी नागरिक व व्यापाऱ्यांकडून करण्यात येत आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/F4uD1Fqnz3sBgCKFsrOSDq

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

2,020 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क