छत्रपती संभाजीनगर : कर्णपुरा परिसरातील मैदानाजवळ असलेल्या हनुमान मंदिरात झालेल्या चोरीचा गुन्हा अवघ्या १५ तासांत उघडकीस आणत गुन्हे शाखेच्या पथकाने पाच सराईत आरोपींना अटक केली आहे. आरोपींकडून चोरीला गेलेला सुमारे २ लाख ९ हजार ४६५ रुपयांचा मुद्देमालही जप्त करण्यात आला असून, या कारवाईची माहिती पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.

शुक्रवारी (दि. २३) पहाटे अज्ञात चोरट्यांनी मंदिरातील हनुमान मूर्तीवरील सोन्या-चांदीचे दागिने तसेच दोन दानपेट्यांमधील रोख रक्कम चोरून नेली होती. या प्रकरणी छावणी पोलिस ठाण्यात शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी तातडीने गुन्हे शाखेची पथके तैनात केली. मंदिर परिसरातील तसेच आजूबाजूच्या भागातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यात आली. त्याआधारे काही संशयितांची ओळख पटविण्यात पोलिसांना यश आले.

पोलिस तपासात चोरीतील मुख्य आरोपी अमजद खान सलीम खान (२८, रा. जलाल कॉलनी) यास ताब्यात घेतल्यानंतर पोलिसी चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्या माहितीवरून शेख शोएब शेख बाबा (३०, अलहिलाल कॉलनी), शेख समीर शेख सलीम (२३, कटकटगेट), शेख आमेर शेख नब्बु (२९, रोजाबाग) आणि इम्रान खान ऊर्फ इम्मा युनुस खान (२२, कटकटगेट) या चार साथीदारांना अटक करण्यात आली.

आरोपींनी मूर्तीवरील सोन्याच्या पत्त्याचा टिळा, चांदीच्या भुवया, डोळे, दोन्ही पायांतील चांदीचे कडे, चांदीचे त्रिशूल तसेच रोख रक्कम चोरल्याचे निष्पन्न झाले. सर्वच आरोपी रेकॉर्डवरील असून, मुख्य आरोपी अमजद खान याच्यावर यापूर्वीही चोरीसह इतर गुन्हे दाखल आहेत. त्याच्याकडून चोरीच्या दोन दुचाकीही जप्त करण्यात आल्या आहेत.

ही संपूर्ण कारवाई उपायुक्त रत्नाकर नवले, सहायक आयुक्त अशोक राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे वरिष्ठ निरीक्षक गजानन कल्याणकर, उपनिरीक्षक जगन्नाथ मेनकुदळे व संदीप काळे यांच्या पथकाने केली. अटक केलेल्या आरोपींना जिल्हा न्यायालयात हजर केले असता त्यांना सहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/F4uD1Fqnz3sBgCKFsrOSDq

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

1,391 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क