छत्रपती संभाजीनगर : शहरात शेअर मार्केटमध्ये मोठा नफा मिळवून देण्याच्या आमिषाने गुंतवणूकदारांना गंडा घालण्याचे प्रकार वाढत असून, अशाच दोन स्वतंत्र प्रकरणांत तब्बल ८१ लाखांहून अधिक रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. या प्रकरणांनी पुन्हा एकदा ऑनलाईन गुंतवणुकीच्या नावाखाली सुरू असलेल्या सायबर फसवणुकीचा धोका अधोरेखित केला आहे.

पहिल्या प्रकरणात इलेक्ट्रिक ठेकेदार भगीरथ म्हसूजी कांबळे यांची ३७ लाख ९९ हजार ९४० रुपयांची फसवणूक झाली आहे. कांबळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून हर्सूल पोलीस ठाण्यात डुरो कॅपिटल कंपनीसह सात जणांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. निमू गोवर्धनभाई परमार, क्रिष्णकुमार के. बरवार, विष्णू एम., अभिजित संजय तुपे, अमन कुमार आणि आदित्य सुनील जाधव (सर्व रा. छत्रपती संभाजीनगर) अशी आरोपींची नावे आहेत.

कांबळे हे टेलिग्रामवरील ‘व्हीआयपी ग्रुप १८८९’ या शेअर मार्केटशी संबंधित गटात सामील झाले होते. १४ जुलै २०२४ रोजी डुरो कॅपिटल लिमिटेड कंपनीकडून गुंतवणुकीवर ५० ते ६० टक्के नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवण्यात आले. सुरुवातीला नफा दिसत असल्याने कांबळे यांनी मोठी गुंतवणूक केली. आयपीओमध्ये ४४ लाखांची गुंतवणूक करण्यास सांगितल्यानंतर त्यांनी पत्नीच्या नावानेही ट्रेडिंग सुरू केली. मात्र, नफा असूनही पैसे काढता न आल्याने फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. वेळोवेळी त्यांनी एकूण ३७ लाख ९९ हजार ९४० रुपये भरल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

दरम्यान, दुसऱ्या प्रकरणात आयपीओमध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली संगणक अभियंता पवन देशमुख यांची ४३ लाख ७७ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. हा प्रकार ५ डिसेंबर २०२५ ते २४ जानेवारी २०२६ दरम्यान घडला. ‘वेल्थ क्रियेटर्स व्हीआयपी-२८’ या व्हॉट्सअॅप ग्रुपच्या माध्यमातून मोहन शर्मा व मिस्टर अलेक्स यांनी नफ्याचे आमिष दाखवून ही फसवणूक केल्याचे तक्रारीत नमूद आहे. या प्रकरणी जवाहरनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

पोलीस दोन्ही प्रकरणांचा तपास करत असून नागरिकांनी ऑनलाईन गुंतवणुकीच्या आमिषाला बळी पडू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/F4uD1Fqnz3sBgCKFsrOSDq

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

593 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क