छत्रपती संभाजीनगर : शहरात नाकाबंदी फोडून पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका कारचा तब्बल १५ किलोमीटर पाठलाग करत गुन्हे शाखेने नशेच्या सिरपचा मोठा साठा जप्त केला. या थरारक कारवाईत पोलिसांनी तिघा आरोपींना अटक केली असून मुख्य आरोपीसह लातूरमधील मेडिकल चालक व मालकाचा शोध सुरू आहे. या प्रकरणी सिटी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
२४ जानेवारीच्या मध्यरात्री पदमपुऱ्यातील हनुमान मंदिरात चोरी झाल्यानंतर पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी शहरात नाकाबंदीचे आदेश दिले होते. त्यानुसार गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक प्रवीण वाघ हे केंब्रिज चौकात वाहतूक तपासणी करत असताना एक तवेरा कार (एमएच १२ एचएन ९९१७) आली. थांबण्याचा इशारा दिला असता चालक उमर अब्दुल याने कार न थांबवता नारेगावच्या दिशेने सुसाट पळवली. संशय आल्याने वाघ यांनी वरिष्ठांना माहिती देत खासगी वाहनातून पाठलाग सुरू केला.
दरम्यान, पोलीस निरीक्षक गजानन कल्याणकर हे चालक दादासाहेब झारगड यांच्यासह टीव्ही सेंटरकडे निघाले. आयबी मेस परिसरात त्यांनी कार आडवी लावून आरोपींना रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, आरोपींनी थेट पोलिसांच्या अंगावर कार घालण्याचा प्रयत्न केला. यावेळी जीव धोक्यात घालून झारगड यांनी धावत्या तवेराच्या बोनेटवर उडी मारत काच फोडली, तरीही आरोपी पळतच राहिले.
पाठलाग सुरू असतानाच पंचायत समितीसमोर सापळा लावण्यात आला. तेथे आरोपींनी अंमलदार गणेश सागरे यांच्या अंगावर कार घालत त्यांना जखमी केले. पुढे रस्ता बंद असल्याने आरोपी कारमधून उतरून पळण्याचा प्रयत्न करीत असताना चार पोलीस पथकांनी त्यांना शिताफीने पकडले. कारची झडती घेतली असता सुमारे ३ हजार १२० नशेच्या सिरपच्या बाटल्या आढळून आल्या.
या कारवाईत शेख समीर राजासाब (२४), सय्यद अल्ताफ वहाब (२३) आणि उमर अब्दुल साहाब शेख (३६) यांना अटक करण्यात आली आहे. मुख्य आरोपी अशपाक पटेल (रा. चंपाचौक, शहाबाजार) फरार असून तो लातूरच्या मराठवाडा मेडिकलमधून सिरपची तस्करी करत असल्याचे तपासात उघड झाले आहे. ८० रुपयांची बाटली ४०० रुपयांना विकली जात असल्याचेही स्पष्ट झाले आहे.
आरोपींकडून १२ लाख ४८ हजार ८०० रुपयांचा सिरप साठा व एकूण १८ लाख ७८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली. विशेष म्हणजे, बारावीत ८९ टक्के गुण मिळवलेला गुणवंत विद्यार्थी समीर झटपट पैशाच्या लालसेपोटी तस्करीकडे वळल्याचे समोर आले आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/F4uD1Fqnz3sBgCKFsrOSDq
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*