छत्रपती संभाजीनगर :  शहरातील एका नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वसतिगृहात अत्यंत धक्कादायक आणि चिंताजनक प्रकार उघडकीस आला आहे. वसतिगृहात एकत्र राहणाऱ्या मैत्रिणीनेच एका तरुणीचे कपडे बदलतानाचे फोटो व व्हिडिओ चोरून चित्रित करून ते आपल्या प्रियकराला पाठवल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पीडित तरुणीच्या तक्रारीवरून सिडको पोलिस ठाण्यात आरोपी तरुणी आणि तिचा प्रियकर स्वराज धालगडे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी आणि आरोपी तरुणी या दोघीही शहरातील एका नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालयात तिसऱ्या वर्षात शिक्षण घेत असून गेल्या तीन वर्षांपासून त्या वसतिगृहात एकत्र राहत आहेत. १९ जानेवारी रोजी रात्री सुमारे १० वाजताच्या सुमारास आरोपी तरुणी आपल्या प्रियकराशी फोनवर संशयास्पद संभाषण करत असल्याचे पीडितेच्या लक्षात आले. “फोटो आणि व्हिडिओ कसे वाटले? हॉट आहेत का?” असे शब्द ऐकून पीडितेला संशय आला. तिने तात्काळ आरोपीचा मोबाइल ताब्यात घेऊन पासवर्ड विचारत तपासणी केली.

मोबाइलमधील गॅलरी आणि स्नॅपचॅट अ‍ॅप तपासल्यानंतर पीडितेला मोठा धक्का बसला. १८ जानेवारी रोजी पीडित तरुणी खोलीत कपडे बदलत असताना आरोपी मैत्रिणीने तिचे चोरून फोटो आणि व्हिडिओ काढल्याचे उघड झाले. हे फोटो व व्हिडिओ आरोपी तरुणीने आपल्या प्रियकर स्वराज धालगडे याला पाठवल्याचेही स्पष्ट झाले.

या घटनेमुळे मानसिक धक्का बसूनही पीडित तरुणीने धाडस दाखवत ही बाब वसतिगृहाच्या वॉर्डन आणि आपल्या पालकांना सांगितली. पालकांच्या पाठिंब्यानंतर तिने सिडको पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. दरम्यान, प्रकरण उघडकीस येताच आरोपी तरुणीने सुरुवातीला माफी मागितली; मात्र तक्रार पोलिसांपर्यंत जाणार असल्याचे लक्षात येताच तिने पीडितेवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. तक्रार केल्यास स्वतःचे नुकसान करून घेण्याची धमकीही दिल्याचा आरोप पीडितेने केला आहे.

सिडको पोलिसांनी या प्रकरणी गंभीर दखल घेत तपास सुरू केला असून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/F4uD1Fqnz3sBgCKFsrOSDq

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

1,512 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क