छत्रपती संभाजीनगर : शहरातील पदमपुरा भागात कर्णपुरा ते आरटीओ रस्त्यावर असलेल्या सुमारे २५० ते ३०० वर्षे जुन्या हनुमान मंदिरात चोरीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अज्ञात चोरट्यांनी मंदिराचे मुख्य चॅनल गेट तोडून आत प्रवेश करत हनुमानाच्या मूर्तीवरील सोन्या-चांदीचे किरकोळ दागिने तसेच मंदिराच्या कपाटातील सुमारे अडीच लाख रुपयांची रोकड चोरून नेली. शनिवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर परिसरात संतापाची भावना व्यक्त होत आहे.

मंदिराच्या स्वच्छतेसाठी ट्रस्टकडून लक्ष्मी चक्रवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नेहमीप्रमाणे त्या शनिवारी पहाटे सुमारे पाच वाजता मंदिरात साफसफाईसाठी गेल्या असता मुख्य चॅनल गेटचे कुलूप तुटलेले आढळून आले. त्यांनी तात्काळ मंदिराचे अध्यक्ष संजय बारवाल यांना माहिती दिली. त्यानंतर बारवाल यांच्यासह इतर ट्रस्ट सदस्यांनी घटनास्थळी धाव घेतली असता मंदिरात चोरी झाल्याचे स्पष्ट झाले.

सीसीटीव्ही फुटेजनुसार पहाटे सुमारे ३ वाजून ४७ मिनिटांच्या सुमारास चोरट्यांनी गेट तोडून मंदिरात प्रवेश केला. जवळपास ३७ मिनिटे ते मंदिरात थांबले होते. विशेष म्हणजे मंदिरासमोर मुख्य रस्ता असून रात्रभर वाहनांची सतत वर्दळ असतानाही चोरट्यांनी ही चोरी केल्याने नागरिकांमध्ये भीती आणि नाराजी व्यक्त होत आहे. हनुमानाच्या मूर्तीवरील सोन्याचा टिळा, चांदीच्या भुवया, पायातील चांदीचे कडे तसेच कपाळावरील चांदीचा त्रिशूळ चोरट्यांनी चोरून नेल्याचे निदर्शनास आले आहे.

या घटनेनंतर दुपारी माजी महापौर नंदकुमार घोडेले, गजानन बारवाल, हर्षदा शिरसाट, राजू राजपूत, अभिजीत जीवनवाल आणि विजय वाघचौरे यांनी पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांची भेट घेऊन तातडीने तपास करण्याची मागणी केली. गुन्हे शाखा आणि छावणी पोलिसांसह तीन पथके तपास करत असून चोरट्यांचा लवकरच शोध लागेल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/F4uD1Fqnz3sBgCKFsrOSDq

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

928 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क