छत्रपती संभाजीनगर : शहरात लुटमारीच्या घटनांनी पुन्हा एकदा डोके वर काढले असून, गुन्हेगारांची दहशत वाढताना दिसत आहे. पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या चार तरुणांना चाकूचा धाक दाखवत लुटल्याची गंभीर घटना जाधववाडी परिसरात घडली आहे. २८ जानेवारी रोजी मध्यरात्री साडेबारा वाजता ही थरारक घटना घडली.
मूळ चिखली (ता. पैठण) येथील निखिल विजय बुरकूल (१९) हा शहरात पोलिस भरतीची तयारी करत आहे. तो अनिकेत थुट्टे, प्रसाद शिंगणे व अन्य एका मित्रासह जाधववाडीत खिचडी खाण्यासाठी गेला होता. बाजारपेठेतून परत येत असताना मोपेडवर आलेल्या तिघांनी चौघांना अडवले. ‘तुम्ही दुकानांचे शटर फोडायला आला आहात का?’ असा आरोप करत त्यांनी चौघांवर चोरीचा आळ घेतला. त्यानंतर चौघांचे मोबाइल हिसकावून त्यांना जवळच्या एका इमारतीच्या गच्चीवर नेण्यात आले.
तेथे तरुणांना मारहाण करण्यात आली. एकाच्या पोटाला चाकू लावून धमकावण्यात आले. निखिलच्या मोबाइलमधून एका महिलेच्या खात्यावर १,४०० रुपये ऑनलाइन ट्रान्सफर करण्यात आले. अनिकेतच्या खिशातील १,५०० रुपये, तर प्रसादकडील २,००० रुपये जबरदस्तीने काढून घेण्यात आले. एकूण ४,९०० रुपयांची लूट केल्यानंतर ‘आम्ही चोरी करत होतो’ असे जबरदस्तीने वदवून घेत त्याचे मोबाइलमध्ये चित्रीकरण करण्यात आले.
लुटारूंनी त्यानंतर आणखी ५,००० रुपयांची मागणी केली. पैसे नसल्याचे सांगितल्यावर चौघांचे मोबाइल जप्त करत २९ जानेवारी रोजी दुपारी जाधववाडी बस डेपोजवळ २०,००० रुपये आणून दिल्यासच मोबाइल परत मिळतील, अशी धमकी दिली. पैसे न दिल्यास पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या अकॅडमीमध्ये येऊन हत्या करू, अशी दहशत निर्माण करणारी धमकी देण्यात आली. या प्रकरणाचा अधिक तपास हेड कॉन्स्टेबल मंगेश पवार करत आहेत.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/IJbzVXxActY7zUsWoQ3lSr?mode=gi_t
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*