छत्रपती संभाजीनगर : शहरात भिशीच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. भिशी म्हणून गोळा केलेले पैसे परत न देता माय-लेकाने १६ जणांना सुमारे २ कोटी ९९ लाख २० हजार रुपयांचा गंडा घातल्याप्रकरणी मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार सन २०१८ ते जुलै २०२५ या कालावधीत घडला.

नंदाबाई रमेश आधुडे आणि तिचा मुलगा सौरभ रमेश आधुडे (रा. व्यंकटेश पार्क, बीड बायपास) अशी आरोपींची नावे आहेत. या प्रकरणातील फिर्यादी जयश्री गजानन गिरी (४२, रा. संतोषीमातानगर, मुकुंदवाडी) असून त्या साडी सेंटरचा व्यवसाय करतात. २०१८ साली जयश्री गिरी जयभवानीनगर परिसरात वास्तव्यास असताना भिशी चालविणाऱ्या एका व्यक्तीमार्फत त्यांची आरोपी नंदाबाई आधुडे हिच्याशी ओळख झाली. सुरुवातीला आरोपीकडे लावलेली भिशी नियमित पार पडल्याने जयश्री गिरी यांचा तिच्यावर विश्वास बसला.

डिसेंबर २०२१ मध्ये महिन्याला १० हजार रुपयांप्रमाणे ६ लाखांची भिशी सुरू करण्यात आली. या भिशीत जयश्री गिरी यांनी दोन नंबर लावून मोठी रक्कम गुंतविली. मात्र, हाराशीच्या नावाखाली उचललेले पैसे आरोपी नंदाबाई हिने स्वतःकडेच ठेवले. पुढील काळात १२ लाखांची आणखी भिशी सुरू करून जयश्री गिरी यांच्याकडून तब्बल २० लाख रुपये उकळण्यात आले. असेच प्रकार इतर भिशी सदस्यांसोबतही घडल्याचे तपासात उघड झाले.

या प्रकरणात जयश्री गिरी यांच्यासह एकूण १६ जणांची फसवणूक झाली असून काहींना ५० लाखांपर्यंतचा गंडा बसला आहे. एकूण रकमेपैकी सुमारे ६ लाख ९९ हजार ५०० रुपये ऑनलाइन तर २ कोटी ९२ लाख २० हजार ५०० रुपये रोखीने दिल्याचे निष्पन्न झाले आहे.

गुन्हा दाखल होताच सहायक पोलीस निरीक्षक संजय बहुरे यांनी आरोपी माय-लेकाला अटक केली असून न्यायालयाने त्यांना ३ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. कोट्यवधी रुपयांचा अपहार नेमका कशासाठी केला, याचा सखोल तपास पोलीस करत आहेत.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/IJbzVXxActY7zUsWoQ3lSr?mode=gi_t

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

1,277 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क