छत्रपती संभाजीनगर : विनापरवाना बाळगलेल्या गावठी पिस्टलचा निष्काळजीपणे वापर करताना अचानक गोळी सुटून मित्र गंभीर जखमी झाल्याची घटना वाळूज परिसरात उघडकीस आली आहे. या प्रकरणी वाळूज पोलिसांनी खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करत एका संशयिताला अटक केली आहे. अझर शफी सय्यद (वय ४०, रा. अन्सार कॉलनी, पडेगाव) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, महेश दत्तात्रेय पवार (वय २३, रा. बजाजनगर) हा तरुण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना जुन्या शिवराई फाट्यालगत असलेल्या एका हॉटेलजवळ घडली.

शुक्रवारी मध्यरात्री अझर आणि महेश हे दोघे हॉटेलजवळ थांबून गावठी पिस्टल पाहत होते. त्यावेळी निष्काळजीपणे हाताळताना पिस्टलमधून अचानक गोळी सुटली. ही गोळी महेशच्या उजव्या मांडीमध्ये घुसली, ज्यामुळे तो गंभीर जखमी झाला. घटनेनंतर अझरने पोलिसांना कोणतीही माहिती न देता महेशला तत्काळ घाटी रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान जखम बंदुकीच्या गोळीमुळे झाल्याचे डॉक्टरांच्या लक्षात येताच त्यांनी पोलिसांना माहिती दिली.

यानंतर पोलिस उपनिरीक्षक वंदना मुळे यांनी रुग्णालयात जखमी महेशचा जबाब नोंदवला. चौकशीत अझरकडे विनापरवाना पिस्टल असल्याचे स्पष्ट झाले. तसेच अझरने सुरुवातीला खोटी माहिती दिल्याचेही उघडकीस आले. पोलिसांनी पडेगाव येथील त्याच्या घरावर छापा टाकून गावठी पिस्टल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त केली.

तपासादरम्यान अझरने हे पिस्टल त्याचा भाऊ इम्रान सय्यद याने आणल्याचे सांगितले, मात्र इम्रानचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणी खुनाच्या प्रयत्नासह बेकायदेशीर शस्त्र बाळगल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाने अझरला ११ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली असून पुढील तपास वाळूज पोलीस करत आहेत.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/IJbzVXxActY7zUsWoQ3lSr?mode=gi_t

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

1,292 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क