छत्रपती संभाजीनगर :  जिल्ह्यातील लासूर स्टेशन परिसरात नातेसंबंधांनाच काळिमा फासणारी एक धक्कादायक हत्या उघडकीस आली असून आईनेच जावयाच्या मदतीने आपल्या पोटच्या मुलाची सुपारी देऊन हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. शहानवाजपूर शिवारातील एका विहिरीत २६ जानेवारी रोजी आढळलेल्या बेवारस मृतदेहामागील रहस्य पोलिसांनी उलगडल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

विहिरीत अंदाजे ३५ ते ४० वयोगटातील पुरुषाचा मृतदेह तरंगताना नागरिकांना आढळून आला होता. मृतदेह बुडवण्यासाठी त्याला दगडांनी भरलेली पोती बांधून दोरीने आवळण्यात आले होते. मात्र शरीर फुगल्याने ते पाण्यावर आले आणि हा प्रकार उघडकीस आला. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पाहणीदरम्यान हा अपघात नसून घातपात असल्याचे स्पष्ट झाले.

मात्र मृताची ओळख पटवणे हे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. कपड्यांवरून ओळख पटवण्याचा प्रयत्न झाला, परंतु नातेवाईकांनी सुरुवातीला मृतदेह ओळखण्यास नकार दिला. यानंतर पोलिसांनी वैज्ञानिक तपासाचा मार्ग अवलंबत आईचा डीएनए नमुना फॉरेन्सिक प्रयोगशाळेत पाठवला. अहवालात मृतदेहाचा डीएनए तिच्याशी जुळल्याने सगळे सत्य उघड झाले.

चौकशीत आईने धक्कादायक कबुली दिली. मुलगा सतत त्रास देत असून मारहाण करत असल्याने ती वैतागली होती. याबाबत तिने आपला जावई कमलसिंग सिंगल याला सांगितले. दोघांनी मिळून मुलाचा काटा काढण्याचा निर्णय घेतला. यासाठी कमलसिंगचा मित्र गोरख अहिरे याला ३० हजार रुपयांची सुपारी देण्यात आली.

या तिघांनी मिळून हत्या करून मृतदेह विहिरीत टाकल्याचे निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी सर्व आरोपींना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेने मानवी नात्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/LC9pzB4lHXXKDuIr4cUPAq?mode=gi_t

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

1,217 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क