छत्रपती संभाजीनगर : शहरात महिलांचा विश्वास संपादन करून त्यांना गंडा घालणाऱ्या एका ठगाचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शिवणकामाचे प्रशिक्षण देण्याच्या नावाखाली महिलांना शिलाई मशीन मिळवून देण्याचे आमिष दाखवत संबंधित ठगाने जवळपास अडीच तोळे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना ९ फेब्रुवारी रोजी सायंकाळी सिडको परिसरातील मिसारवाडी येथे घडली.

महेश खरात असे स्वतःचे नाव सांगणाऱ्या इसमाने १ फेब्रुवारीपासून परिसरात घरोघरी जाऊन शिवणकाम प्रशिक्षणाबाबत माहिती देणारी पत्रके वाटली होती. क्लास पूर्ण केल्यानंतर विशेष योजनेतून मोफत शिलाई मशीन मिळवून देण्याचे आश्वासन देत त्याने महिलांचा विश्वास संपादन केला. यावर विश्वास ठेवून पाच महिलांनी प्रत्येकी २०० रुपये शुल्क भरून प्रशिक्षणासाठी प्रवेश घेतला. २ फेब्रुवारीपासून दुपारी दोन ते साडेचार या वेळेत त्याने परिसरातच प्रशिक्षण सुरू केले.

६ फेब्रुवारी रोजी ठगाने शिलाई मशीनसाठी कागदपत्रांची प्रक्रिया असल्याचे सांगत महिलांकडून सोन्याच्या दागिन्यांच्या पावत्यांच्या प्रती मागवल्या. त्यानंतर ९ फेब्रुवारी रोजी क्लासनंतर पुन्हा महिलांचे फोटो काढण्याचे नाटक करत प्रत्यक्ष दागिने आणण्यास सांगितले. महिलांनी विश्वासाने दागिने आणताच त्याने प्लास्टिकच्या पिशव्यांत ते ठेवायला सांगितले आणि फोटो काढत असल्याचे भासवून चारही पिशव्या घेऊन क्षणात पलायन केले.

या घटनेत प्रज्ञा यांचे ८ ग्रॅम, समीक्षा व यशोदा यांचे प्रत्येकी ४.५ ग्रॅम, भाग्यश्री यांचे ३ ग्रॅम तसेच अन्य एका महिलेचे २ ग्रॅम असे एकूण जवळपास अडीच तोळे सोन्याचे दागिने लंपास झाले आहेत.

प्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, सहायक पोलिस निरीक्षक योगेश गायकवाड तपास करत आहेत. ठगाने वापरलेला मोबाईल क्रमांक परराज्यातील दुसऱ्याच व्यक्तीच्या नावे नोंद असल्याचे उघड झाले असून, पोलिसांकडून आरोपीचा शोध युद्धपातळीवर सुरू आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/LC9pzB4lHXXKDuIr4cUPAq?mode=gi_t

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

694 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क