छत्रपती संभाजीनगर : महानगरपालिकेने मागील वर्षी जून व जुलै महिन्यात शहरात मोठ्या प्रमाणावर रस्ता रुंदीकरण मोहीम राबविली होती. या मोहिमेत साडेपाच हजारांहून अधिक बाधित मालमत्तांवर कारवाई करण्यात आली. शहरातील प्रमुख रस्ते २०० फूट रुंदीचे करण्यासाठी महापालिकेला किमान ३ हजार कोटी रुपयांचा निधी आवश्यक असून, यासाठी शासनाकडे निधीची मागणी करण्यात आली आहे. रस्ता रुंदीकरण मोहीम थांबलेली नसल्याचे आयुक्त जी. श्रीकांत यांनी यापूर्वी अनेक वेळा स्पष्ट केले असून, सोमवारी आणखी आठ रस्त्यांचे रुंदीकरण लवकरच सुरू होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
महापालिका निवडणुकीची प्रक्रिया सुरू असल्याने प्रशासनाने काही काळासाठी रस्ता रुंदीकरण मोहिमेला ब्रेक दिला होता. आता निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाली असून, २९ प्रभागांतून ११५ नगरसेवक निवडून आले आहेत. येत्या १० तारखेला महापौर व उपमहापौर पदाची निवडणूक होणार आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी आयुक्त जी. श्रीकांत यांनी विभागप्रमुखांची आढावा बैठक घेतली. या बैठकीस पोलिस उपायुक्त पंकज अतुलकर व रत्नाकर नवले उपस्थित होते.
बैठकीत शहरातील आठ डीपी रस्त्यांच्या रुंदीकरणासाठी लवकरच मोहीम सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार भूसंपादनाची रीतसर प्रक्रिया पूर्ण करूनच कारवाई केली जाणार आहे. त्यासाठी सविस्तर नियमावली ठरविण्यात आली आहे. मोहिमेपूर्वी संबंधित रस्त्याचे ‘टोटल स्टेशन’ सर्वेक्षण करून बाधित मालमत्तांचा नकाशा तयार केला जाईल. मालमत्ताधारकांना नोटिसा देऊन त्यांना आपली बाजू मांडण्याची संधी दिली जाईल. कारवाईपूर्वी झोन अधिकारी, संबंधित पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक व पोलिस उपायुक्त संयुक्त पाहणी करतील. या तिघांच्या एकमतानंतरच कारवाईचे व्हिडीओ चित्रीकरण केले जाणार आहे.
चंपा चौक ते जालना रोड, पैठण रोड ते विधि विद्यापीठ, दिल्ली गेट ते हसूल टी-पॉइंट, हसूल टी-पॉइंट ते सावंगी, सेव्हन हिल ते भाजीवाली बाई पुतळा, रेणुका माता परिसर-सातारा-कांचनवाडी गट क्रमांक ४२, तसेच नक्षत्रवाडी ते धुळे-सोलापूर महामार्ग या रस्त्यांचा समावेश आहे.
दरम्यान, अतिक्रमण हटविताना नगरसेवक किंवा त्यांच्या नातेवाइकांनी अडथळा आणल्यास महापालिका अधिनियम १/१० (अ)(ड) नुसार त्यांचे सदस्यत्व रद्द करण्याची शिफारस केली जाईल, असा इशाराही प्रशासनाने दिला आहे. तसेच रुंदीकरणाच्या किमान आठ दिवस आधी पोलिस प्रशासनाला माहिती देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यापूर्वी पाडापाडी झालेल्या पाच रस्त्यांसाठी डीपीआर तयार करण्याचे काम पेडेको संस्थेमार्फत सुरू असल्याची माहितीही महापालिकेने दिली आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/IJbzVXxActY7zUsWoQ3lSr?mode=gi_t
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*