खुलताबाद : हनुमान जयंतीनिमित्त प्रसिद्ध भद्र मारुती मंदिरात शुक्रवार (११ एप्रिल) व शनिवार (१२ एप्रिल) रोजी लाखोंच्या संख्येने भाविकांची गर्दी होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जिल्हा पोलिस प्रशासनाने कडेकोट बंदोबस्ताचे नियोजन केले आहे. खुलताबाद शहर व मंदिर परिसरात तब्बल ६०० पोलिसांचा ताफा तैनात करण्यात आला आहे.
गेल्या काही दिवसांत औरंगजेबाच्या कबरीवरून निर्माण झालेला वाद, त्यावरून झालेले राजकीय वक्तव्य आणि नागपूरमध्ये निर्माण झालेला तणाव लक्षात घेता यंदाची हनुमान जयंती पोलिसांसाठी अधिक महत्त्वाची मानली जात आहे. पोलिसांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
विशेष पोलिस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र व जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड यांनी खुद्द बंदोबस्ताचा आढावा घेतला. यंदाही लाखो भाविक दर्शनासाठी येणार असल्याने चोख व्यवस्था ठेवण्यात आली आहे.
असा असेल बंदोबस्त
बंदोबस्ताचे प्रभारी अधिकारी म्हणून उपविभागीय पोलिस अधिकारी विजयकुमार ठाकूरवाड यांची नेमणूक करण्यात आली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली २ पोलिस निरीक्षक, १७ सहाय्यक निरीक्षक व उपनिरीक्षक, १६८ पोलिस अंमलदार, एक दंगा काबू पथक, १०० हून अधिक एसआरपीएफचे सशस्त्र जवान, तसेच ३९८ होमगार्ड ४८ तास तैनात असणार आहेत.
तसेच शनिवारी मध्यरात्रीपर्यंत खुलताबादमार्गे येणाऱ्या सर्व प्रकारच्या जड वाहनांवर बंदी घालण्यात आली आहे. भाविकांनी सहकार्य करावे, असे आवाहन पोलिस प्रशासनाने केले आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/IBQjYargTnVERr4Mfn8oZR
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*