राज्यात सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला असून भाजपने मोठा निर्णय घेतला आहे. भाजपच्या विधिमंडळ गटनेतेपदी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची निवड करण्यात आली आहे. आज झालेल्या भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.
गटनेते पदासाठी चंद्रकांत पाटील आणि सुधीर मुनगंटीवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. सर्व भाजप आमदारांनी एकमताने त्यांच्या नावाला पाठिंबा दर्शवला. या निर्णयानंतर सेंट्रल हॉलमध्ये आमदारांची बैठक झाली, ज्यामध्ये फडणवीस यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली.
यावेळी नव-निवडून आलेल्या आमदारांचे पक्षाकडून स्वागत करण्यात आले. प्रत्येक आमदाराच्या डोक्यावर भगवा फेटा बांधण्यात आला. नागपूरमध्ये फडणवीस यांच्या घराबाहेर समर्थकांनी फटाके फोडून आणि ढोल-ताशांच्या गजरात जल्लोष केला.
फडणवीस यांच्या नावाच्या ठरावाला पंकजा मुंडे, प्रविण दरेकर, रवींद्र चव्हाण, आणि संजय कुटे यांच्यासह सर्व नवनिर्वाचित आमदारांनी अनुमोदन दिले. आता राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांची निवड निश्चित झाली आहे.
देवेंद्र फडणवीस उद्या सायंकाळी ५ वाजता मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. या शपथविधीसाठी विविध मान्यवर आणि पक्षश्रेष्ठी उपस्थित राहणार आहेत.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/K9Y55vdUS298mQnTz6IgYT
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*