छत्रपती संभाजीनगर : एसटी बसचालकाच्या कॅबिनमध्ये वाहक व प्रवासी गप्पा मारताना आढळून आल्यास आता कारवाई केली जाणार आहे. एसटी महामंडळाच्या अमरावती आगारात घडलेल्या घटनेनंतर महाव्यवस्थापक (वाहतूक) यांनी कडक आदेश जारी करत ही कारवाई करण्यात येईल, असा इशारा दिला आहे.
गर्दीच्या वेळी अनेक प्रवासी चालकाच्या कॅबिनमध्ये उभे राहतात किंवा बसतात. काही वेळा वाहकही प्रवाशांचे बुकिंग पूर्ण करून चालकाच्या कॅबिनमध्ये येऊन संवाद साधतात. यामुळे बस चालवणाऱ्या चालकाचे लक्ष विचलित होण्याची शक्यता असते. गप्पा आणि हातवाऱ्यांच्या ओघात नियंत्रण सुटून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
असाच एक प्रकार अमरावती आगारात घडला. एका प्रवाशाने थेट मुख्य कार्यालयात तक्रार दाखल केली. याची गंभीर दखल घेत महामंडळाने चालकाच्या कॅबिनमध्ये कोणीही अनधिकृतपणे प्रवेश करणार नाही, याची दक्षता घेण्याचे आदेश दिले आहेत. यापुढे असे आढळून आल्यास वाहक व प्रवाशांवरही कडक कारवाई होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
एसटी महामंडळाच्या नियमानुसार चालकाच्या कॅबिनमध्ये गप्पा मारण्यास परवानगी नाही. मात्र अनेकजण हा नियम पाळत नाहीत. त्यामुळे प्रवाशांनी व वाहकांनी ही बाब गांभीर्याने घ्यावी, असे आवाहनही महामंडळाने केले आहे. चालकाच्या सुरक्षिततेसह प्रवाशांचाही जीव धोक्यात नको, यासाठी ही कारवाई करण्यात येत आहे.